GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: मेलेल्या कोंबड्यांची नदीपात्रात विल्हेवाट लावल्याबद्दल पालिकेकडून दंड

Gramin Varta
139 Views

राजापूर : शहरातील कोदवली (गोडी) नदीपात्रात मेलेल्या कोंबड्यांची घाण टाकून नदीपात्र दूषित केल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच राजापूरच्या पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गौस जमादार कोंबडीवाले यांनी मेलेल्या कोंबड्यांची विल्हेवाट गोडी नदीपात्रात लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होण्याबरोबरच परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

घटनेची गंभीर दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पाहणी करून संबंधितांना दंड ठोठावला. तसेच भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा पुन्हा करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली.

दरम्यान, राजापूर नगरपरिषदेकडून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे, नदीपात्र, नाले किंवा अन्य भागांमध्ये कचरा अथवा घाण टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण आणि शहर स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Total Visitor Counter

3377925
Share This Article