GRAMIN SEARCH BANNER

राजापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार

माजी आमदार गणपतराव कदम व माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांची पत्रकार परिषदेत माहिती

राजापूर : येथील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत झाले असून यावर आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असा ठाम विश्वास माजी आमदार गणपतराव कदम आणि माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर विकासाभिमुख आणि स्वच्छ प्रशासनासाठी जनतेचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.

राजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार गणपतराव कदम म्हणाले, “काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसे हे चारही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या रूपाने ही निवडणूक लढणार आहेत. राजापूरच्या नागरिकांनी आजवर नेहमी प्रगतीला प्राधान्य दिले आहे. विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि शहर स्वच्छतेच्या बाबतीत आमची ठोस भूमिका असेल.”

त्यांनी पुढे सांगितले की, “आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय असून, एकत्रित प्रयत्नांमुळे आम्ही नगर परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवू. आमचे ध्येय सत्तेचा वापर न करता सेवेचा उपयोग करणे हे आहे.”

माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे म्हणाल्या, “जनमत असणाऱ्या, समाजाशी जवळीक राखणाऱ्या आणि प्रत्यक्ष लोकसेवा करणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल. आमचा उद्देश फक्त निवडणूक जिंकणे नसून, जनतेचा विश्वास जपणे आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत शहराला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

पत्रकार परिषदेत आघाडीतील सर्व पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, महिला नेते, युवक कार्यकर्ते उपस्थित होते. शहराच्या प्रत्येक प्रभागात आघाडीचे संघटन मजबूत असून, नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे उपाय शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी लढणारी ही आघाडीच नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी होईल, असा आत्मविश्वास या दोन्ही माजी आमदारांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3486740
Share This Article