दापोली : दापोली तालुक्यातील करंजाणी येथे एका महिलेच्या मालकीच्या शेतीत अनधिकृतपणे प्रवेश करून झाडांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक ५ जुलै रोजी दुपारी २ वाजण्यापासून ते २१ जुलै संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याची माहिती आहे.
या प्रकरणी करंजाणी (मावळतवाडी) येथील रहिवासी वैजयंती रघुनाथ कालेकर (वय ४०) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार बिपिन पाटणे (रा. दापोली), संतोष दत्ताराम कालेकर (रा. करंजाणी), तसेच करंजाणी ग्रामपंचायतीचे सध्याचे सरपंच (संपूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही) यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून हेतुपुरस्सर झाडांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीतील माहितीनुसार, आरोपींनी इंटरनेट व वाय-फायची वायर काजू, आंबा, दालचिनी, कोकम आणि ऐन या झाडांना बांधल्यामुळे या झाडांचे कायमस्वरूपी नुकसान झाले. एकूण नुकसानाचा अंदाज सुमारे एक लाख रुपये इतका असून हे नुकसान दीर्घकालीन स्वरूपाचे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपी बिपिन पाटणे, संतोष कालेकर व सरपंच यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 अंतर्गत कलम 329(3), 324(5), आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.
दापोली : महिलेच्या शेतात घुसून 1 लाखांचे झाडांचे नुकसान, सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल
