राजन लाड / जैतापूर :
अनंत चतुर्दशी संपून दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ७ सप्टेंबर) जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने जैतापूर खाडीत करण्यात आले. तब्बल २६ वर्षांपासून सुरू असलेल्या या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीने यावर्षीही भाविकांना मंत्रमुग्ध केले.
उत्सवात नवा उपक्रम – लकी ड्रॉ
तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित या मंडळाने यंदाही विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्सव साजरा केला. यावर्षी प्रथमच १० रुपयांच्या तिकिटावर विविध बक्षिसे लकी ड्रॉच्या स्वरूपात देण्यात आली. या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विसर्जन मिरवणुकीत कलाविष्कारांची रंगत
मिरवणुकीला शनिवारी दुपारी ४ वाजता जैतापूर एसटी स्टँड येथून सुरुवात झाली. ढोल ,ताशा ,बँजो लेझीम, नृत्य व वाद्यवृंदाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमला. तुळसुंदे येथील वनिता महिला मंडळाच्या लेझीम पथकाने सादर केलेल्या तालबद्ध लेझीमने आणि गौरी म्युझिकल बॅन्जो पार्टीचे किरीट आडीवेकर व सहकाऱ्यांनी वाजवलेल्या वाद्यवृंदाने भाविकांना थिरकायला भाग पाडले.
संध्याकाळी साडेआठ वाजता मिरवणूक जैतापूर बंदर धक्का येथे पोहोचली. त्यानंतर होडीतून गणरायाची मूर्ती खाडीत नेऊन आरती,घंटानाद व ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले.
या उत्सवाला आमदार किरण उर्फ भैया शेठ सामंत, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त आर्थिक सहकार्य करत मंडळाच्या कार्याला हातभार लावला.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करण्यात आले. सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड तैनात होते. लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून मिरवणुकीचे निरीक्षण केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या विसर्जन सोहळ्याचे यशस्वी आयोजन शक्य झाल्याबद्दल गणेशभक्त, मान्यवर, स्थानिक प्रशासन, पोलीस, तसेच विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या पथकांचे आभार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मानण्यात आले.