GRAMIN SEARCH BANNER

रेल्वे प्रवाशाला 35 लाखांना लुटणाऱ्या चोरट्याला चिपळूणातून १२ तासांत अटक

Gramin Search
9 Views

चिपळूण: मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून दागिने, रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कल्याण आणि मुंबई पथकाने १२ तासांत चिपळूण येथून अटक केली आहे. महेश घाग ऊर्फ विक्की असे ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे

इंदोर-दौंड एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका वृद्ध महिलेने उशाखाली ठेवलेली तब्बल ३४ लाख ९८ हजार रुपयांची मौल्यवान पिशवी शुक्रवारी (ता. २०) चोरीला गेली होती. याप्रकरणी तातडीने तपास करून पोलिसांनी महेश घाग ऊर्फ विक्की या सराईत गुन्हेगाराला अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरी केलेला संपूर्ण ऐवज हस्तगत केला आहे. गुरुवारी (ता. १९) रात्री इंदोर-दौंड एक्स्प्रेसने प्रवास करत असलेल्या वृद्ध महिलेकडे सोने, हिरे, मौल्यवान दागिने व रोख रक्कम असा एकूण ३४ लाख ९८ हजारांचा ऐवज असलेली पिशवी होती. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती पिशवी उशाखाली ठेवली होती. शुक्रवारी सकाळी कल्याण स्थानकात गाडी पोहोचल्यावर त्यांनी पिशवी तपासली असता ती गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला महेश घाग इंदोर एक्स्प्रेसमधून उतरून घाईघाईने निघून जाताना दिसला. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी चिपळूण येथे पाठवलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

महेश याने चौकशीत चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरी केलेली पिशवी हस्तगत केली आहे. त्या पिशवीत मोत्यांचा हार, हिऱ्याच्या बांगड्या, सोनसाखळ्या, सोन्याच्या रिंग्स, घड्याळ, तसेच मोठी रोख रक्कम आढळून आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाठ आणि राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, उपनिरीक्षक सुधाकर सावंत यांच्यासह हवालदार संदीप गायकवाड, स्मिता वसावे, राम जाधव, प्रमोद दिघे, अक्षय चव्हाण, रवींद्र ठाकूर, पद्मा केंजळे, मंगेश खाडे, विक्रम चावरेकर, देविदास अरण्ये, संदेश कोंडाळकर, अमोल अहिनवे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.

Total Visitor Counter

2648825
Share This Article