खेड : मणिपूर, इंफाळ येथे सुरू असलेल्या 134व्या ड्युरंड करंडक फुटबॉल स्पर्धेत खेड तालुक्यातील मोरवंडे-बौद्धवाडी येथील प्रेम प्रमोद मर्चंडे याने भारतीय सैन्य दलाचे प्रतिनिधित्व करत आपल्या संघास विजेतेपद मिळवून दिले. ड्युरंड करंडक ही आशियातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित समजली जाणारी फुटबॉल स्पर्धा असून, या स्पर्धेत मिळवलेले यश संपूर्ण कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.
प्रेम मर्चंडे सध्या भारतीय सैन्य दलाच्या 2 महार रेजिमेंटमध्ये सेवा बजावत आहे. त्याच्या संघाने या स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामना जिंकला आणि ड्युरंड करंडक आपल्या नावे केला. या विजयामुळे प्रेम मर्चंडेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रेमने बोरज येथील नॅशनल फुटबॉल अकॅडमी कॅम्पमध्ये प्रशिक्षक किशोर आदावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले होते. फुटबॉलमध्ये नैसर्गिक कौशल्य, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर त्याने सैन्य संघात स्थान मिळवले आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत झेंडा फडकवला.
चार वर्षांपासून सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रेमने सतत परिश्रम घेतले. 4 डिसेंबर 2024 रोजी त्याने प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दलात अधिकृतपणे प्रवेश केला. लवकरच त्याला उत्कृष्ट जवान म्हणून सन्मानही मिळाला होता. या कामगिरीनंतर आता खेळाच्या मैदानावरही त्याने आपली छाप पाडली आहे.
प्रेम प्रमोद मर्चंडे याने मिळवलेले हे यश संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी ठरत असून, यामुळे ग्रामीण भागातील युवकांमध्येही नव्या आशा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यापुढील स्पर्धांमध्येही देशाचे प्रतिनिधित्व करत आणखी मोठे यश मिळवण्याचा निर्धार प्रेमने व्यक्त केला आहे.
खेडच्या प्रेम मर्चंडेचा आशिया फुटबॉल स्पर्धेत डंका
