GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : ज्येष्ठ नागरिकाच्या घरात 2 लाखांचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला दोन वर्षांचा तुरुंगवास

Gramin Varta
290 Views

7 महिन्यात निकाल, राजापूर पोलिसांचे कौतुक, सरकारी वकील भालचंद्र सुपेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य

राजापूर : तालुक्यातील सोलगाव भटवाडी येथे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या घरी घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरीणीने विश्वासघात करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी तिला दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ. एस. एस. हाके यांनी सुनावली.

या प्रकरणी चंद्रकांत सखाराम शेलार (वय 67, रा. भटवाडी, सोलगाव, राजापूर) यांनी फिर्याद दिली होती. वैष्णवी विलास नलावडे (वय 42) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

शेलार दाम्पत्य पत्नी चंद्रकला (वय 64) यांच्यासह राहतात. पत्नीला मधुमेहाचा त्रास असल्याने घरकामास मदत मिळावी म्हणून त्यांनी ‘मोलकरीण हवी’ अशी जाहिरात स्थानिक वृत्तपत्रांत दिली होती. त्या जाहिरातीला प्रतिसाद देत वैष्णवी नलावडे ही घरकामासाठी त्यांच्या घरी दाखल झाली. पंधरा दिवसांतच तिने शेलार दाम्पत्याचा विश्वास संपादन केला.

८ मार्च २०२५ रोजी दुपारी जेवणानंतर शेलार दाम्पत्य हॉलमध्ये झोपले असताना वैष्णवीने ‘मी टॉयलेटला जाऊन येते’ असे सांगून मागच्या दरवाज्याने निघून गेली. ती परत न आल्याने संशय आल्यावर शेलार यांनी तपास केला असता घरातील कपाट उघडून पाहिले तेव्हा सोन्याचे दागिने व ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे उघड झाले.

चोरीचा मुद्देमाल

तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३.५ ग्रॅम सोन्याच्या रिंग्ज, ४ ग्रॅम वजनाच्या कानातील कुड्या आणि ५ हजार रुपये रोख — असा एकूण २ लाख १३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

चोरीनंतर वैष्णवी ही गुजरातमधील वलसाड येथे एका ओळखीच्या व्यक्तीकडे गेल्याचे समजले. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशनच्या आधारे शोध घेऊन तिला चिपळूण बसस्थानकात अटक केली. तिच्या अंगझडतीत सोन्याचे मंगळसूत्र, रोख पाच हजार रुपये आणि काही खोटे दागिने मिळून आले.

पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोबीन शेख यांनी केला. कोर्ट पैरवीसाठी सचिन बळीप यांनी काम पाहिले. सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुपेकर यांनी सरकार पक्षाचे युक्तिवाद सादर केले.

सरकार पक्षाच्या पुराव्यांवर विश्वास ठेवून न्यायालयाने वैष्णवी नलावडे हिला दोन वर्षांचा सक्तमजुरीचा तुरुंगवास आणि ५,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Total Visitor Counter

3369793
Share This Article