चिपळूण : खेड तालुक्यातील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम घरडा हॉस्पिटलच्या सहकार्याने पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. श्रुतिका कोतकुंडे आणि डॉ. प्रीती सब्रवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे समुपदेशक डॉ. सतीश जाधव यांच्या प्रस्ताविकेने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले आणि या कार्यक्रमाचे उद्दिष्ट तसेच विद्यार्थ्यांसाठी त्याचे महत्व समजावून सांगितले.
यानंतर डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी अत्यंत सोप्या भाषेत मानसिक आजारांविषयी माहिती दिली. त्यांनी मानसिक आजारांबद्दल समाजात असलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना योग्य माहिती दिली. तसेच सोशल मीडियाच्या अति वापरामुळे होणारे मानसिक दुष्परिणाम आणि ‘सेक्सटोर्शन’ या वाढत्या धोक्याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना सजग केले. पुढील सत्रात डॉ. प्रीती सब्रवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने चर्चा करत ताण कमी करण्यासाठी काही सोपी तंत्रे प्रत्यक्ष करून दाखवली. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्साहाने सहभाग घेतला आणि तणाव नियोजनाविषयी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ. मारुती सातपुते तसेच घरडा हॉस्पिटलच्या रचना तिवारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि रेजिस्ट्रार संदीप मुंघाटे यांचे मार्गदर्शन लाभले.