GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : तळवडे गावच्या सुगंधा तिरमलची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड

Gramin Varta
220 Views

देवरूख: तळवडे गावच्या सुगंधा संतोष तिरमल हिने अनेक संकटांवर मात करत महाराष्ट्र सुरक्षा दलात स्थान मिळविले आहे.

घराकडून शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने दररोज ८ किलोमीटर पायी प्रवास, प्रशिक्षणासाठी कोणतीही अॅकॅडमी नाही, दररोज तळवडे गाव ते टिकटेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर धावण्याचा सराव, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची अशा स्थितीत सुगंधाच्या मनात वडिलांचे पोलीसभरतीचे स्वप्न सत्यात उतरवण्याची जिद्द होती.

आईवडील आणि चार बहिणींचे तिचे कुटुंब आहे. सुगंधाचे वडील संतोष तिर्मत यांना पोलिसात भरती व्हायचे होते. मात्र काही अडचणींमुळे ते पोलीस होवू शकले नाहीत. त्यांनी मोलमजुरी करून पाचही मुलांना लहानाचे मोठे केते. सुगंधाचे प्राथमिक शिक्षण तळवडे जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शिक्षण देवरूख हायस्कूल तर महाविद्यालयीन बीकॉमपर्यंतचे शिक्षण देवरूख महाविद्यालयात झाले. ते घेत असतानाच सुगंधाने पोलीस होऊन वडिलांची इच्छा सत्यात उतरवायचा चंग बांधला. देवरूखच्या छत्रपती शिवराय स्पोर्टस क्लबची ती खेळाडू होती. खो-खो खेळात तिने आपला ठसा उमटवला. तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी तिला निखिल कोळवणकर, सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. नागपूर, नाशिक, गडचिरोली, परभणी, औरंगाबाद, मुंबई येथील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत तिने गावाचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले. पोलीसभरतीसाठी तिने २०१९ मध्ये मुंबईत, २०२४-२५ मध्ये सिंधुदुर्गात सहभागी झाली होती. मात्र तिची निवड होऊ शकली नाही. अखेर दौंड येथे गेल्या ३ डिसेंबर ते १७ जानेवारी या कालावधीत प्रशिक्षणासाठी सुगंधाला बोलावणे आले अन् तिची निवड पक्की झाली. तिची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली. कोणत्याही क्षेत्रात अपयश आल्यास खचून जायचे नाही. सदैव प्रयत्न सुरू ठेवायचे, अंगी प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास उराशी सदैव बाळगा, असा संदेश तिने तरुणांसाठी दिला आहे.

Total Visitor Counter

3388222
Share This Article