GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण बायपासवर दारुड्याचा थरार;गाडी सावकाश चालव म्हणणाऱ्या भावांवर दगडफेक

Gramin Varta
93 Views

चिपळूण :  शहरातील गुहागर बायपास रस्त्यावर एका चायनीज सेंटरसमोर शुक्रवारी रात्री एका दारुड्या दुचाकीस्वाराने भररस्त्यात थरार घडवला. दुचाकी सावकाश चालवण्याचे सांगणाऱ्या दोन भावांना या संशयिताने बेदम मारहाण केली असून, या हल्ल्यात एका तरुणाच्या बरगडीला गंभीर दुखापत (फ्रॅक्चर) झाली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन भरत आवले (वय ३९, रा. खेड गणपती मंदिर जवळ, चिपळूण) आणि त्यांचा भाऊ निलेश हे शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून गुहागर बायपासने घराकडे जात होते. यावेळी समोरून पाग येथील रहिवासी असलेला राकेश गोरीयले हा दारूच्या नशेत आपली दुचाकी हेडलाईट न लावता वेडीवाकडी चालवत आला. यावेळी निलेश आवले याने ‘गाडी सावकाश चालव’ असे ओरडून सांगितले. याचा राग मनात धरून संशयित आरोपीने आपली गाडी वळवून पुन्हा त्या ठिकाणी येत आवले बंधूंना गाठले आणि अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ सुरू केली.

हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना संशयिताने निलेशच्या कानाखाली मारून त्याला धक्काबुक्की केली. या झटापटीत निलेशचा शर्ट फाटला आणि खिशातील ५००० रुपये हरवून त्याचे नुकसान झाले. संतापलेल्या आरोपीने त्यानंतर रस्त्यावरील दगड उचलून निलेशवर भिरकावला, मात्र निलेशने तो वार चुकवला. यावेळी आपला भाऊ संकटात असल्याचे पाहून सचिन आवले हे मदतीला धावले असता, आरोपीने दुसरा मोठा दगड उचलून थेट सचिन यांच्या डाव्या बरगडीवर जोरात मारला. या जबर प्रहारामुळे सचिन यांच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर आरोपीने “तुम्हाला ठार मारतो” अशी धमकी देऊन तेथून पळ काढला.

या घटनेनंतर जखमी सचिन आवले यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून, त्यांनी शनिवारी मध्यरात्री चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत संशयित आरोपी राकेश गोरीयले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११८(१), ३५२, ३५१(३), ३२४(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ८६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून दहशत माजवणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3224079
Share This Article