GRAMIN SEARCH BANNER

‘ग्रामीण वार्ता’ची दखल : सुट्टीचा दिवस असतानाही अधिकारी थेट फुणगुस येथे शेतकऱ्याच्या बांधावर

Gramin Varta
514 Views

फुणगुस येथील घडशी कुटुंबाला मिळणार मदत

संगमेश्वर: ‘ग्रामीण वार्ता’ने संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील शेतकरी चंद्रकांत तानाजी घडशी यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची सविस्तर बातमी ‘संगमेश्वर: वर्षभराची शेती पावसात भिजली; रेशनसुद्धा मिळत नाही!’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करताच, प्रशासकीय यंत्रणांनी त्याची तातडीने दखल घेतली आहे. सुट्टीचा रविवारचा दिवस असतानाही, संबंधित विभागातील अधिकारी वर्ग थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले. ही तत्परता आणि संवेदनशीलता खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरली आहे.

यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे संगमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, परंतु फुणगूस येथील घडशी कुटुंबावर मोठे संकट आले आहे. शेती हाच एकमेव उपजीविकेचा आधार असलेल्या या कुटुंबातील सात सदस्यांचे पोट पूर्णपणे भातशेतीवर अवलंबून होते. कापणीसाठी सज्ज झालेले भातपीक अतिवृष्टी आणि पाण्यामुळे अक्षरशः वाहून गेले, ज्यामुळे घरात अन्नधान्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकरी चंद्रकांत घडशी यांनी आपली व्यथा मांडताना, “आमचं रेशन कार्ड गरीब रेषेच्या वर असल्याने आम्हाला शासनाकडून कोणतेही धान्य मिळत नाही. ही शेतीच आमचं सर्व काही होती, आयुष्याचा आधार होती, पण आता तेच नाहीसे झाले आहे. घरातले सातजण काय खाणार, कसं जगणार?” असा हृदयद्रावक प्रश्न उपस्थित केला होता.

‘ग्रामीण वार्ता’ने मांडलेल्या याच गंभीर व्यथेची दखल घेत, प्रशासकीय अधिकारी आज प्रत्यक्ष शेतावर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान पाहता, त्यांनी तातडीने कार्यवाही करत संवेदनशीलता दाखवली. या महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यात उप कृषी अधिकारी मिलिंद आंबेकर आणि तलाठी शंतनू जिरगे हे शासकीय अधिकारी, तसेच सरपंच अशोक पांचाळ, पोलीस पाटील प्रशांत थुळ आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात फिरून नुकसानीची पाहणी केली आणि तातडीने पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे नुकसान भरपाई मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. पंचनामा झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सोमवारी, दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुढील आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहावे.
शेतकऱ्यांनी सोबत आणायची कागदपत्रे:
१. ७/१२ व ८अ चे उतारे
२. आधार कार्डची झेरॉक्स प्रत
३. बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
४. शेतकरी आयडी क्रमांक (Farmer ID)
५. झालेल्या नुकसानीचे फोटो

‘ग्रामीण वार्ता’च्या बातमीमुळे प्रशासकीय यंत्रणा हलल्यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आता मदतीची आशा पल्लवित झाली आहे. सुट्टीचा दिवस असतानाही अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता ही स्थानिक प्रशासनाच्या संवेदनशील भूमिकेची द्योतक आहे.

Total Visitor Counter

3072722
Share This Article