देवरुख: देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्याच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ‘स्मार्ट’ राजकीय खेळी पाहायला मिळाली आहे. तरुणांची संघटना असलेल्या गाव विकास समिती (रत्नागिरी जिल्हा) ने थेट आम आदमी पार्टी सोबत युती करत, आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ‘आप’च्या अधिकृत चिन्हावर (झाडू) लढविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेणाऱ्या गाव विकास समितीने यंदा नगराध्यक्ष पदासाठी ‘आप’ सोबत हातमिळवणी केली आहे. गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे आणि आपचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव यांनी पारदर्शक कारभार आणि विकासाची हमी या मुद्द्यांवर एकत्र येत ‘गाव विकास समिती व आम आदमी पार्टी शहर विकास युती’ची बांधणी केली. नुकतीच या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
गाव विकास समितीची ‘स्मार्ट’ खेळी:
गाव विकास समितीचे नेतृत्व – संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय घोटाड आणि सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थेट ‘आप’च्या चिन्हावर लढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. हा उमेदवार गाव विकास समिती व आम आदमी पार्टी युतीचा उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात असणार आहे.
गाव विकास समितीकडे स्वतःचे चिन्ह नसल्यामुळे संघटनेला प्रत्येक वेळी अपक्ष म्हणून लढावे लागते. यामध्ये मिळणारे चिन्ह निश्चित नसल्याने ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक वेळ आणि श्रम लागतात. हा वेळ वाचवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत त्वरित पोहोचण्यासाठी, समविचारी युती झाल्यानंतर गाव विकास समितीने आपला उमेदवार थेट ‘आप’च्या ‘झाडू’ या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला.
‘आप’चे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. यामुळे गाव विकास समितीच्या उमेदवाराला एका राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाले आहे, ज्यामुळे त्यांची ओळख मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. या माध्यमातून आपचे धोरण देखील लोकांपर्यंत पोहचणार आहे.
‘आप’ आणि गाव विकास समिती या दोन्ही संघटनांचे धोरण हे सामान्य माणसाच्या हिताचे असून त्या पारदर्शक कारभारासाठी लढत आहेत. संगमेश्वर तालुक्यात या दोन्ही संघटना एकत्र आल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. आता देवरुखची जनता पारदर्शक कारभार आणि विकासाचे व्हिजन घेऊन मैदानात उतरलेल्या या युतीला कसा प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ही युती देवरुखच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






