GRAMIN SEARCH BANNER

साखरी-नाटे परिसरात उघड्यावर टाकलेल्या तांदुळामुळे गुरांचा मृत्यू ; अज्ञातावर गुन्हा दाखल

नाटे: राजापूर तालुक्यातील वाघेटी सुकाड सडा परिसरात एका चिरेखणीत अज्ञात व्यक्तीने टाकलेले तांदूळ खाल्ल्याने तीन गुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एक गाभण गाय, एक पाडी आणि एका पाड्याचा समावेश असून, या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम यशवंत पोकळे (वय ७०, रा. पाणेरे, राजापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी शांताराम पोकळे यांची गुरे वाघेटी सुकाड सडा येथील चिरेखण परिसरात चरण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी कोणातरी अज्ञात इसमाने तांदळाचे पोते उघड्यावर टाकले होते. चरत असताना या गुरांनी त्या पोत्यातील तांदूळ खाल्ले. विषबाधा झाल्यामुळे फिर्यादी यांची एक गाभण गाय, एक पाडी आणि एक पाडा असे एकूण तीन जनावरे मृत्युमुखी पडली. सुरुवातीला एक पाडा अस्वस्थ झाला होता, मात्र त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा तीनही गुरांचा मृत्यू झाला.

आपल्या मालकीच्या दुभत्या आणि गाभण जनावरांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने शेतकरी शांताराम पोकळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीने टाकलेले ते तांदूळ विषारी होते का किंवा त्यामागे कोणाचा घातपात करण्याचा उद्देश होता का, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत नाटे पोलिसांनी ९ एप्रिल रोजी अज्ञातांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुक्या प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या अज्ञात इसमाचा शोध पोलीस घेत आहेत.

Total Visitor Counter

3434126
Share This Article