9 किमी अंतराच्या जीर्ण वीजतारा बदलल्या तर 500 वाकलेले वा गंजलेले वीज खांब बदलले
216 खराब रोहित्र पेट्या बदलल्या तर 425 रोहित्र वितरण पेट्यांची स्वच्छता दुरुस्ती पूर्ण
रत्नागिरी : आगामी पावसाळ्यात जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित, दर्जेदार आणि सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरण प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पावसाळ्यातील संभाव्य तांत्रिक बिघाड कमीत कमी करण्याच्या उद्देशाने महावितरणच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. संभाव्य वादळ-वारा आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी महावितरणची यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.
या मोहिमेअंतर्गत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात प्राधान्यक्रमाने वीज वाहिन्या आणि उपकरणांची दुरुस्ती केली आहे. यामध्ये ४,२६८ वीज वाहिन्यांच्या गाळ्यातील वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यात झाडे पडून होणारे बिघाड टाळता येतील. तसेच ५२५ वीज वाहिन्यांच्या गाळ्यातील सैल झालेल्या वीजतारा ओढून घट्ट करण्यात आल्या असून, ३५९ गाळ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गार्डींग बसविण्यात आले आहे. सुरक्षेला प्राधान्य देत यंत्रणेतील ९ किलोमीटर अंतराच्या जीर्ण झालेल्या वीजतारा बदलण्यात आल्या आहेत, तर ५०० वाकलेले आणि गंजलेले वीज खांब काढून त्या जागी नवीन मजबूत खांब उभे करण्यात आले आहेत. लघुदाब वीज वाहिन्यांमध्ये २,७९० पीव्हीसी स्पेसर्स बसविण्यात आले असून २७९ ठिकाणी जंपर बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. तांत्रिक अचूकतेसाठी ६३० पिन, ४२६ डिस्क आणि ३३८ स्टे इन्सुलेटर बदलण्यात आले असून, २१६ खराब रोहित्र पेट्या बदलण्यासोबतच ४२५ रोहित्र वितरण पेट्यांची स्वच्छता व दुरुस्ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे.
या व्यापक मोहिमेत उपरी आणि भूमीगत वीजवाहिन्यांची तपासणी, अर्थिंगची दुरूस्ती, रोहित्रांच्या तेलाची गळती रोखणे, सिलीका जेल बदलणे, खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर व सर्व्हिस वायर बदलणे, आणि उपकेंद्रांमधील वाढलेले गवत काढून तिथे स्वच्छता राखणे अशी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उपकेंद्रांतील बॅटरींची स्थिती आणि आयसोलेटर अलाइनमेंटची देखील कसून तपासणी करण्यात आली आहे.
पावसाळ्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सक्षमपणे सामना करण्यासाठी महावितरणने पुरेशी तयारी ठेवली आहे. यासाठी आवश्यक असणारा सर्व सामुग्री आणि उपकरणांचा साठा, जसे की रोहित्र ऑईल, नवीन वीज खांब, आणि इन्सुलेटर इत्यादींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. मान्सूनच्या काळात क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ तास दक्ष राहण्याच्या आणि कोणत्याही समस्येवर त्वरित मार्ग काढण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
महावितरणने जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी आणि तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७८७५७६५०१८ हा आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला असून, नागरिक आणि वीज ग्राहक कोणत्याही संकटसमयी या क्रमांकावर थेट संपर्क साधू शकतात. याशिवाय, शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र २४ तास कार्यरत राहणार असून, ग्राहक १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधून आपल्या तक्रारी नोंदवू शकतात, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.




