रत्नागिरी: दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हिंदू बांधवांची लगबग सुरू झाली आहे. यानिमित्त रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांत विविध प्रकारचे आकर्षक, रंगीबेरंगी आकाशकंदील विक्रीस उपलब्ध झाले आहेत.
आकाशकंदील खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड पहावयास मिळत आहे. कागदी, कापडी, प्लास्टिक, वॉटरफ्रूपसह विविध फोटोफ्रेम असलेल्या कंदिलांना मागणी वाढली आहे.
दसरा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. दसर्यानंतर नागरिकांना दिवाळी सणाची आतुरता लागली आहे. त्यामुळे घरोघरी स्वच्छता, घराला रंग मारणे यासह विविध कामे सुरू झाली आहेत. सजावट साहित्यासह विविध खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत झुंबड पाहावयास मिळत आहे. दिवाळीत घर, दुकाने, गल्लीबोळात यासह सर्वच ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याने परिसर उजळून निघतो. दिवाळी म्हणजे प्रत्येकजण आवर्जून आकाशकंदीलची खरेदी करतोच. गॅलरीत, खिडकीला, इमारतीवर आकाशकंदील लावण्यात येत असतात.
रत्नागिरी बाजारपेठेसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेतील दुकानासमोर षटकोनी, डायमंड, स्टार, चौकोनी आयताकृती खणाचे कंदील, जाणता राजा, स्वामी समर्थ, फोटो फ्रेम तसेच वॉटरफ्रूप आणि मॅजिक स्टार व फोल्डींग फ्रेम आकाशकंदील उपलब्ध आहेत. आकर्षक, रंगीबेरंगी आकाशकंदील विक्रीसाठी बाहेर लावण्यात आले आहेत. पारंपरिक आकाशकंदिलांना मोठी मागणी आहे. छोट्यापासून मोठ्या आकाशकंदिलांची मोठ्याप्रमाणात विक्री होत आहे. 100 रुपयापासून ते एक हजार रुपयांपर्यंत आकाश कंदीलची विक्री होत आहे.
रत्नागिरी: दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठा आकाशकंदिलांनी सजल्या
