लांजा/वार्ताहर
महिलांसाठी असलेले उपक्रम एकावेळे पुरते मर्यादित न ठेवता त्या उपक्रमांची व्याप्ती वाढवून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी बोलताना व्यक्त केले.
स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत टाकाऊ वस्तू पासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन लांजा नगरपंचायतीच्या सभागृहात सोमवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ठेवण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजित कुंभार हे उपस्थित महिलांशी संवाद साधताना बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, नगरपंचायतीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांनी व्यापक दृष्टीकोन ठेवून या उपक्रमातून रोजगाराची संधी शोधण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही बनविलेल्या वस्तू मर्यादित उपक्रमात न राहता बाजारपेठेत विक्रीला जाव्यात यासाठी नगरपंचायत प्रशासन तुमच्या पाठीशी उभे राहील आणि यापेक्षाही मोठे उपक्रम महिलांसाठी भविष्यात घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच प्रदर्शनातील वस्तूंमधील आवश्यक वस्तू नगरपंचायतीच्या पुढील होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये संबंधितांकडून घेऊन त्यांना आर्थिक सहकार्यही केले जाईल.
नगरपंचायत सभागृहात पार पडलेल्या प्रदर्शनात महिलांकडून टाकाऊ वस्तूपासून पॉट, फुलदाणी, पायपुसणी, प्लास्टिक परडी, वॉल क्राष्ठ, कापडापासून बनविलेल्या वस्तू, धुप कांडी आणि गोधडी अशा विविध वस्तू बनवून ठेवण्यात आल्या होत्या. प्रदर्शनातील सर्व वस्तूंची पाहणी करत मुख्याधिकारी कुंभार यांनी महिलांचे कौतुक केले.
दरम्यान या उपक्रमावेळी मुख्याधिकारी अभिजित कुंभार, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी अनघा भाटकर, गितांजली नाईक, स्वच्छता निरीक्षक सुरज जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रिना अल्हाट, समुदाय संघटक सुशांत नाखरेकर, लिपिक संजय गुरव, मुकादम रवींद्र कांबळे व जयदीप वायंगणकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे – मुख्याधिकारी अभिजित कुंभार
