गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाला वेग! कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजातील ४ उड्डाणपूल ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Gramin Varta
184 Views

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीला आळा बसावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आता युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महामार्गाच्या कामाचा केवळ आढावा न घेता प्रत्यक्ष कामाला गती देऊन निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील महत्त्वाची कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला असून कोलेटी, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील चार उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात दाखल होणाऱ्या लाखो चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी संथगतीने सुरू असल्याने गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांना यंदाही वाहतूक कोंडी आणि रखडलेल्या कामांचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महामार्गाची पाहणी करून कामाला गती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गणेशोत्सवापूर्वी महामार्ग शक्य तितका सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

माणगाव बायपाससाठी २० ऑगस्टपासून रेल्वेचा मेगाब्लॉक

माणगाव बाह्यवळण मार्गाचे कामही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरणार आहे. या सुमारे साडेसात किलोमीटरच्या मार्गापैकी साडेपाच किलोमीटर भागात एकेरी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी २० ऑगस्टपासून कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामाला वेग देण्यात येणार असून माणगाव बाह्यवळण मार्गावरील उर्वरित सुमारे दोन किलोमीटरचा भागही एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात माणगाव परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

चिपळूणचा मोठा उड्डाणपूल अद्याप आव्हान

चिपळूण येथील मोठ्या उड्डाणपुलाचे कामही वेगाने सुरू करण्यात आले आहे. या उड्डाणपुलावरील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून प्रांत कार्यालयाजवळील भरावाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र या पुलाचे संपूर्ण काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे काहीसे अवघड असल्याचे बांधकाम विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे रखडलेली कामे वेळेत पूर्ण करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आता चार महत्त्वाच्या उड्डाणपुलांसह माणगाव बायपासच्या कामाला दिलेला वेग प्रत्यक्षात कितपत उतरतो आणि गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांना किती दिलासा मिळतो, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4697519
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *