GRAMIN SEARCH BANNER

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘सिंधुदुर्गनगरी’ हे ७५९ वे नवीन महसुली गाव जाहीर

Gramin Varta
56 Views

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस परिसरातील ‘सिंधुदुर्गनगरी’ आता स्वतंत्र महसुली गाव म्हणून ओळखले जाणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याबाबतची अधिसूचना जाहीर केली असून, १ जानेवारी २०२६ पासून हे नवीन गाव अस्तित्वात आले आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण महसुली गावांची संख्या आता ७५९ वर पोहोचली आहे.

सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरणाची स्थापना २ एप्रिल १९९८ रोजी करण्यात आली होती. यासाठी ओरोस बुद्रुक, अणाव आणि रानबांबुळी या तीन गावातील एकूण ३३४-२०-२० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले होते. हे संपूर्ण क्षेत्र आता स्वतंत्र ‘सिंधुदुर्गनगरी’ महसुली गाव म्हणून ओळखले जाईल.

आता ओरोस बुद्रुक: १३४.१२.८० हेक्टर,

अणाव: ९५.४७.७० हेक्टर, व

रानबांबुळी: १०४.५९.७० हेक्टरवर असेल.

मूळ गावांच्या क्षेत्रावर कोणताही परिणाम नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नवीन गाव निर्मिती करताना प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला नाही. रानबांबुळी येथील जे ७७.३१ हेक्टर क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित होते पण संपादित झाले नव्हते, ते मूळ रानबांबुळी गावातच कायम राहणार आहे. यामुळे ओरोस बुद्रुक, अणाव आणि रानबांबुळी या मूळ गावांच्या उर्वरित सीमांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

नवीन महसुली गाव निर्माण झाल्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल आणि ग्रामविकास विभागामार्फत मिळणारे विविध दाखले मिळवताना होणारी तांत्रिक अडचण दूर होईल. स्वतंत्र महसुली गाव असल्याने स्थानिक प्रशासकीय कामांना गती येईल.

महसुली गाव निर्मिती आणि प्रस्तावित सिंधुदुर्गनगरी या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र असून, महसुली गावामुळे नियोजित विकासाला बळ मिळणार आहे.

या निर्णयाची अंतिम अधिसूचना लवकरच राज्य शासनाच्या राजपत्रात (Gazette) प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3366978
Share This Article