दिल्ली: सीआरपीएफ आणि आयटीबीपीचे माजी महासंचालक अनीश दयाल सिंह यांची नवीन उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांच्यावर प्रामुख्याने देशांतर्गत सुरक्षा आव्हानांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असेल.
यामध्ये जम्मू-काश्मीर, नक्षल प्रभावित क्षेत्र आणि ईशान्येकडील राज्यांसारख्या संघर्षग्रस्त आणि उग्रवादग्रस्त भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
अनिश दयाल सिंह हे १९८८ मणिपूर केडरचे निवृत्त भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. ते आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण बाबींवर काम पाहतील. सध्या देश अनेक प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांना सामोरे जात असताना झालेली ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ते अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व ‘रॉ’चे माजी प्रमुख राजिंदर खन्ना, आयपीएस अधिकारी टी.व्ही. रविचंद्रन आणि माजी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी पवन कपूर यांच्यासह इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत काम करतील. तीन दशकांहून अधिकच्या त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अनीश दयाल सिंह यांचा जन्म ९ डिसेंबर १९६४ रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झाला. तेथील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८८ मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये पोलीस अधिकारी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मणिपूर केडरचे आयपीएस अधिकारी म्हणून केली. ते डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले. त्यांचे बंधू, सौमित्र दयाल सिंह अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
कारकीर्द
अनीश दयाल सिंह यांना सुरक्षा क्षेत्रातील प्रकरणांचा चांगला अनुभव आहे. त्यांनी भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांचे महासंचालक म्हणून सेवा बजावली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक म्हणून त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. ते गुप्तचर यंत्रणेतही (आयबी) दीर्घकाळ कार्यरत होते. यापूर्वी त्यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला होता.
सीआरपीएफ प्रमुख असताना अनीश सिंह यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये नक्षलवादाचा सामना करण्यासाठी सीआरपीएफने केलेली प्रगती, तीन डझनांहून अधिक अत्याधुनिक ऑपरेशनल तळ उभारणे आणि डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाने प्रभावित क्षेत्रांमध्ये चार नवीन बटालियनची स्थापना करणे यांचा समावेश आहे. त्यांनी विविध निवडणुकांच्या काळात सुरक्षेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
सिंह यांनी १३० हून अधिक सीआरपीएफ बटालियनच्या पुनर्रचनेसाठी पुढाकार घेतला होता. गेल्या ८ वर्षांतील ही अशा प्रकारची पहिलीच पुनर्रचना होती. दलाची कार्यक्षमता सुधारणे आणि जवानांना कुटुंबासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश होता. या निर्णयामुळे बटालियन आणि त्यांची मूळ केंद्रे यांमधील सरासरी अंतर १,२०० किलोमीटरवरून ५०० किलोमीटरपर्यंत कमी झाले होते. त्यांनी जवानांकडून थेट अभिप्राय (फीडबॅक) घेण्यासाठी कंपनी कमांडरसोबत संवाद सत्रेही सुरू केली होती.
उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी अनीश दयाल सिंह यांची नियुक्ती
