ब्रेकिंग :  फगर वठारात पुन्हा दरड कोसळली; रस्ता खचला, घरांवर संकटाचे सावट

Gramin Varta
346 Views

संदेश भिसे / रत्नागिरी : शहरालगतच्या फगर वठार परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरड कोसळताच रस्त्याचा मोठा भाग खचला असून हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा निसर्गाचा इशारा दुर्लक्षित केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याच ठिकाणी पहिल्याच पावसात दरड कोसळली होती. त्यावेळी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या, मात्र कायमस्वरूपी संरक्षणाची कामे न झाल्याने पुन्हा दरड कोसळून रस्ता खचला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरड कोसळल्यामुळे परिसरातील घरांनाही धोका निर्माण झाला असून अनेक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास आणखी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिक अक्षरशः धास्तावले आहेत. प्रत्येक पावसाच्या सरीसोबत जीव मुठीत धरून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सध्या येथील नागरिक व वाहन चालकांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या घटनेमुळे फगर वठार परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून दरड रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

Total Visitors :
4654200
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *