GRAMIN SEARCH BANNER

दापोली कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक लैंगिक छळ प्रकरणी निलंबित; चौकशीसाठी समिती गठीत

दापोली: दापोली कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने एका प्राध्यापकावर लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीने थेट कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत कुलगुरूंनी तात्काळ त्या प्राध्यापकाला निलंबित केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समितीही गठीत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित प्राध्यापकाची तात्पुरती बदली दुसऱ्या महाविद्यालयात करण्यात आली आहे. या प्रकरणात विद्यार्थिनीने पोलिसांतही तक्रार दाखल करावी, असा सल्ला विद्यापीठाने तिला दिला आहे. मात्र, दापोली पोलिस ठाण्यात अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कारवाई निश्चित केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. या घटनेमुळे दापोली कृषी महाविद्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

2456034
Share This Article