पनवेल:आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी महाराष्ट्रभर भक्तीचा उत्सव सुरू असतानाच, पनवेलमधील एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या अनोख्या कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कळंबोली येथे राहणाऱ्या नील कमलेश चौधरी या आठवी इयत्तेतील विद्यार्थ्याने चक्क तुळशीच्या नाजूक पानावर विठ्ठलाची सुंदर प्रतिमा साकारली आहे.
नीलला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. त्याने याआधीही छत्रपती शिवाजी महाराजांची स्टोन पेंटिंग, विठ्ठल-रखुमाई, गणपती, नानासाहेब धर्माधिकारी तसेच फुटबॉलपटू रोनाल्डो यांची चित्रे साकारली आहेत. त्याच्या या कलाकृतींना विविध स्पर्धांमधून अनेक पारितोषिके देखील मिळाली आहेत.
या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्ताने नीलने विशेष काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि दोन ते अडीच तासांच्या अथक मेहनतीनंतर त्याने तुळशीच्या एका छोट्याशा पानावर विठुरायाचे सुंदर चित्र रेखाटले. विठ्ठलभक्त आणि वारीत सहभागी होऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी ही कलाकृती एक अनोखा आनंद देणारी ठरली आहे.
नील म्हणतो, विठोबा माझ्यासाठी श्रद्धा आणि साधनेचे प्रतीक आहे. तुळशीचे पान हे पवित्र मानले जाते, त्यामुळे त्यावर विठ्ठलाचे रूप रेखाटताना मला एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली.
या कलाकृतीमुळे विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ न शकणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना एक वेगळा आनंद मिळाल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. नीलचे हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी त्याचे फोटो शेअर करत त्याच्या कौशल्याला आणि भक्तिभावाला सलाम केला आहे.
तेरा वर्षीय विद्यार्थ्याने तुळशीच्या पानावर साकारली विठ्ठलाची प्रतिमा

Leave a Comment