उपसरपंच संदिप घाग याची दोषींवर कारवाईची मागणी
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार नायशी उपकेंद्रात उघड झाला आहे. रुग्णांना वितरित केलेल्या पॅरासिटोमोल गोळ्यांवर बुरशी आणि काळे डाग आढळून आल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त करण्यात आला होता. याबाबत ग्रामीण वार्ता डिजिटल मीडियाने काल मंगळवारी सायंकाळी बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत डॉक्टरांच्या पथकाने बुधवारी नायशी येथे जाऊन बुरशी आलेला औषधसाठा ताब्यात घेतला. मात्र येथील ग्रामस्थ व उपसरपंच संदीप घाग यांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नायशी उपसरपंच संदिप घाग यांनी या घटनेबाबत आवाज उठवल्या नंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. बुधवारी सकाळी डॉ. निरजा यादव (MO) यांच्या पथकाने उपकेंद्राला भेट देऊन बुरशी आलेला औषधांचा साठा व रुग्णांना वितरित केलेल्या गोळ्या ताब्यात घेतला. या पथकात आरोग्य निरीक्षक श्री. डोईफोडे, आरोग्य सेवक श्री. डी. पी. लिंगायत, आरोग्य सेविका श्रीमती पाटील, आशा सेविका ममता गोसावी यांचा समावेश होता. यावेळी सरपंच ऋतिका जाधव, उपसरपंच संदिप घाग आणि पोलीस पाटील प्रशांत पवार उपस्थित होते.
असा प्रकार आला समोर
११ ऑगस्ट रोजी पोलीस पाटील प्रशांत पवार यांचा १२ वर्षीय मुलगा सर्दीच्या उपचारासाठी उपकेंद्रात गेला. तपासणीनंतर दिलेल्या पॅरासिटोमोल गोळ्यांवर बुरशीचे डाग दिसल्याने त्यांनी तत्काळ ही माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. चौकशीत समजले की, संबंधित गोळ्या ८ ऑगस्ट २०२४ रोजी तयार झाल्या असून त्यांची मुदत ७ जुलै २०२६ पर्यंत आहे. मुदतीत असूनही औषधांवर बुरशी निर्माण झाल्याने साठवणूक व गुणवत्ता नियंत्रणातील गंभीर त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत.
ही औषधे जिल्हा आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि उपकेंद्रांना राज्य सरकारकडून पुरवण्यात आली होती. जिल्ह्यातील इतर उपकेंद्रातील पॅरासिटोमोल साठाही खबरदारी म्हणून ताब्यात घेण्यात आला आहे.
उपसरपंच संदिप घाग यांनी सांगितले की, “शासनस्तरावर उपलब्ध होणाऱ्या औषधांमध्ये बुरशी निर्माण होणे ही जनतेच्या जीवाशी खेळ करण्यासारखी बाब आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी आम्ही केली आहे.
ग्रामीण वार्ता इफेक्ट : सावर्डे – नायशी उपकेंद्रातील बुरशी आलेला औषध साठा पथकाने घेतला ताब्यात
