GRAMIN SEARCH BANNER

गणपतीसाठी चाकरमान्यांना दिलासा;कोकणासाठी एसटीच्या 5000 जादा गाड्या!

अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100%, तर सामान्य ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना 50% तिकिट दरात सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई आणि उपनगरांमध्ये कोकणातील लाखो चाकरमानी वास्तव्यास आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या हक्काच्या गणपतीसाठी ते कोकणात रवाना होणार आहेत. यंदा गणपती बाप्पाचे आगमन 27 ऑगस्ट रोजी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर एसटीने प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

मंत्रालयात नुकतीच एसटी महामंडळाची बैठक पार पडली. यामध्ये महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि विविध खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “कोकणचा चाकरमानी, गणपती उत्सव आणि एसटी यांचं अतूट नातं आहे. त्यामुळे नफ्यातोट्याचा विचार न करता यंदाही 5000 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.”

यंदाच्या विशेष सेवेत गट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. 22 जुलैपासून गट आरक्षण सुरू होणार आहे. तसेच, अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100%, तर सामान्य ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना 50% तिकिट सवलत देण्यात येणार आहे.

23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांवरून या बस सेवा सुरू होतील. तिकीट आरक्षणासाठी प्रवाशांना npublic.msrtcors.com, MSRTC Bus Reservation ॲप, तसेच थेट बसस्थानकांवर आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकणातील महामार्गावर वाहनदुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहे, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Total Visitor Counter

2455617
Share This Article