रत्नागिरी: रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या नित्यनिरंतरगतिशीला: या बोधवाक्याचे अनावरण जिल्हा पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या हस्ते झाले.शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात हा कार्यक्रम झाला.
गेल्या साडेतीन वर्षांत २५ हून अधिक यशस्वी उपक्रमांमधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आपले कार्य सिद्ध केले आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब ही रत्नागिरीची खरी ओळख आहे. आता याच सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नित्यनिरंतरगतिशीला: या बोधवाक्याची जोड मिळाली आहे.
प्रगतिपथान्नहि विचलेम परम्परां संरक्षेम | समुत्साहिनो निरुद्वेगिनो नित्यनिरन्तरगतिशीला: ||
या संस्कृतभारतीच्या गीतामधून हे बोधवाक्य घेण्यात आले आहे. याकरिता संस्कृतभारतीचे बहुमोल सहकार्य मार्गदर्शन लाभले.
रत्नागिरीत प्रथमच संस्कृत दिनानिमित्त संस्कृत भारतीतर्फे संस्कृत सप्ताह साजरा होत असून या अंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या बोधवाक्याचे अनावरण शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात करण्यात आले. यावेळी क्लबचे प्रतिनिधी राकेश होरंबे, संस्कृत भारतीच्या प्रांताध्यक्ष डॉ. कल्पना आठल्ये, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख अक्षया भागवत, कोकण प्रांत प्रशिक्षणप्रमुख अॅड. आशीष आठवले आदी मंचावर उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितिन बगाटे म्हणाले की, संस्कृत ही भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेत खूप गोडवा आहे, पावित्र्य आणि भरपूर ज्ञानभांडार आहे, त्यातील ठेवा जपला पाहिजे, प्रत्येकाने ते आत्मसात करण्याची आज वेळ आली आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने (आरसीसी) सायकल चालवून, स्वास्थ्य जपून सुदृढ आरोग्य प्राप्त करत आहे. त्यामुळे बोधवाक्याप्रमाणे संस्कृत जपा व नित्य निरंतर सायकल चालवून गतिशील राहा.
इंग्रजी बोधवाक्य असलेले अनेक सायकल क्लब आहेत. पण सध्या तरी संस्कृत बोधवाक्य असणारा रत्नागिरी सायकलिस्ट क्लब हा बहुधा पहिलाच क्लब आहे. भारतीय नौदल, हवाई दल, आयआयटी, पोलिस दल यासारख्या संस्थांप्रमाणे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनेही संस्कृतमधील बोधवाक्य अंगीकृत केले आहे. यावेळी क्लबच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले. त्यावरही नवे बोधवाक्य झळकले आहे.
संस्कृतचा प्रचार, प्रसार होण्यासाठी संस्कृतभारती व दररोज सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढण्याकरिता रत्नागिरी सायकलिस्ट क्लब कार्यरत आहे. त्यामुळेच या दोन्हीसाठी योगदान असलेल्या प्रसाद देवस्थळी यांनी बोधवाक्याची संकल्पना मांडली. त्याला संस्कृतभारतीने पाठबळ दिले. याप्रसंगी देवस्थळी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्कृतभारती व रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी मेहनत घेतली.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या नित्यनिरंतरगतिशीला: बोधवाक्याचे अनावरण
