वसई:- विरार इमारत दुर्घटनेत मागील वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १६ जणांचा शोध लागला असून त्यात सात जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले आहे.त्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे.
मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे.
सुरुवातीला ढिगारा बाजूला करण्यासाठी जेसीबी पोहचू शकत नसल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले होते. मात्र दुपारनंतर इमारती आणि बाजूच्या चाळी खाली करून काही भाग तोडल्याने बचाव कार्याला गती मिळाली आहे. जवळपास वीस तासाहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. आतापर्यंत १६जणांना या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. यात ९ जण जखमी आहेत तर ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. अजूनही बचाव कार्य सुरूच असून लवकरच अन्य अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
आतापर्यंत मृतांची नाव
आरोही जोविल (२४), उत्कर्षा जोविल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया निवळकर (३८), पार्वती सकपाळ (६०)असे आतापर्यंत मयत झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
जखमींची नावे
जखमींमध्ये संजय सिंग(२४), मिताली परमार(२८) प्रदीप कदम( ४०) जयश्री कदम (३३) विशाखा जोविल (२४), मंथन शिंदे (१९) प्रभाकर शिंदे (५७), प्रमिला शिंदे (५०) प्रेरणा शिंदे (२०) अशी नऊ जण जखमी असून त्यांच्यावर वसई विरार मधील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर
इमारतीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या रहिवाश्यांच्या नातेवाईकांना समजताच मुंबईसह इतर भागात राहणाऱ्या नातेवाईकांनी विरारकडे धाव घेतली. विजयनगर परिसरात गर्दी केली होती. कुणाची आत्या तर कुणाचे दीर आणि सासू ढिगाऱ्याखाली गाडले होते. बचावकार्य सुरु होते मात्र काहींचा दुपारपर्यंत शोध लागला नव्हता. त्यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कोसळलेल्या ढिगाऱ्याकडे पाहत नातेवाईक आक्रोश करीत होते यामुळे परिसरात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुःखाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
पालघर जिल्हयाच्या जिल्ह्याधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दुपारी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना वसई विरार पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दिल्या. त्यांनी यावेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाश्यांच्या नातेवाईकांशी आणि त्याच इमारतीत राहणाऱ्या इतर रहिवाश्यांशी संवाद साधला. बचावकार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, संजय हेरवाडे, प्रांताधिकारी शेखर घाडगे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे आणि इतर अधिकऱ्यांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
विरार इमारत दुर्घटना प्रकरण : २० तासांपासून बचावकार्य सुरूच, मृतांचा आकडा ७ वर
