खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट समाप्त होण्यापूर्वी लोटे बाजूकडील पुलावर १४ जून रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास एका जेसीबीचा अपघात झाला. या अपघातात जेसीबी चालक गंभीर जखमी झाला असून, वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात २५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध सखाराम चाळके (वय ३३, रा. पिरलोटे, दत्तवाडी, खेड) यांनी या अपघाताबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कर्नाटक राज्यातील विजापूर येथील रहिवासी प्रकाश भिमाप्पा लमाणी (वय ३२) हे एमएच ०८ एएक्स ०४९९ क्रमांकाचा जेसीबी टेलिस्कोपिक हँडलर चालवत होते. १४ जून रोजी सायंकाळच्या वेळी परशुराम घाटातून बाहेर पडताना लोटे बाजूकडील पुलावर लमाणी यांनी आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने आणि बेजबाबदारपणे चालवले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे जेसीबी रस्त्याच्या कडेवरील कठड्यावर जाऊन आदळला.
या अपघातात जेसीबी चालक प्रकाश लमाणी यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, जेसीबी टेलिस्कोपिक हँडलरचे स्टिअरिंग, मेन बूम, मोठा टायर आणि दोन काचा यांचे मोठे नुकसान झाले आहे. जेसीबीच्या पुढील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले असून, यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. चालकाने योग्य खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
खेड : परशुराम घाटात जेसीबीचा अपघात; चालकावर गुन्हा
