GRAMIN SEARCH BANNER

शालेय परीक्षा पुढील वर्षीही एप्रिल अखेरपर्यंत, राज्याचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर

Gramin Varta
6 Views

मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) इयत्ता पहिली ते दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात, तर इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा गेल्या वर्षीप्रमाणेच एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात नियोजित करण्यात आल्या आहेत.

गतवर्षी इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक आयत्या वेळी बदलल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या एससीईआरटीने यंदा सावध पवित्रा घेतला आहे.

पहिली ते नववीच्या परीक्षांचे नियोजन करण्याचे अधिकार आतापर्यंत प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना होते. त्यामुळे वार्षिक परीक्षेचे नियोजनही मुख्याध्यापक आपापल्या शाळांच्या वेळापत्रकानुसार करत होते. मात्र, यामुळे शैक्षणिक दिवस वाया जात असल्याचे कारण देत एससीईआरटीने गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा, तसेच संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजेच पॅटचे वेळापत्रक जाहीर केले.

या वेळापत्रकानुसार या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत नियोजित होत्या. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षकांच्या हाती फक्त पाच दिवस होते. या निर्णयावर पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था या सर्व पातळ्यांवर टीका होऊनही एससीईआरटीने आपला निर्णय पुढे रेटला. त्यामुळे यंदा एससीईआरटीने सावध पवित्रा घेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे वेळापत्रक जाहीर करतानाच परीक्षांच्या तारखांचे नियोजन केले आहे.

राज्यभरातील शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा आणि पॅट चाचणी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच घेण्याचेही या वेळापत्रकानुसार निश्चित करण्यात आले आहे. परिणामी गेल्या शैक्षणिक वर्षात घिसाडघाईने घेतलेला परीक्षांबाबतचा निर्णय यंदा शाळांना वेळेतच कळवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्षातील प्रत्यक्ष अध्ययनाचे दिवस एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असून शिक्षकांना यंदाही तातडीने उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करावा लागणार आहे.

Total Visitor Counter

2652197
Share This Article