GRAMIN SEARCH BANNER

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेची ‘सुवर्ण’ भरारी; सोलार अॅग्रो पॉवर कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार

Gramin Varta
25 Views

मुंबई: राज्यातील ४५ लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पुर्णत्वास नेणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेडला नवी दिल्ली येथे शनिवारी (दि. १०) स्कोच समूहाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी सुरू आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही या योजनेला मोठा गती दिली आहे. या दोहोंच्या नेतृत्वात गेल्या सव्वा वर्षांत ३३०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेतून कार्यान्वित झाले असून त्याद्वारे राज्यातील ४० लाख एकर शेतजमिनीवर सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे.

देशाच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या विविध सार्वजनिक क्षेत्रातील योजना व संस्थांना दिला जाणारा स्कोच समूहाचा पुरस्कार हा राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र सन्मान आहे. पुरस्कारासाठी ऊर्जा वर्गवारीमध्ये मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या कामगिरीचे विविध तज्ज्ञांकडून मूल्यमापन करण्यात आले. शेतकरी लाभार्थ्यांचे अभिप्राय घेण्यात आले. यासह तज्ज्ञांच्या मतदानाद्वारे देशात प्रथम ठरलेल्या या योजनेला स्कोच सुवर्ण पुरस्कार जाहीर करण्यात आला. एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. श्रीकांत जलतारे व अधीक्षक अभियंता श्री. निखिल मेश्राम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

जगातील सर्वात मोठ्या १६ हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० द्वारे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती सुरू आहे. या योजनेमुळे महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने औद्योगिक व व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होत जाणार आहेत. या योजनेत आतापर्यंत ३३०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे ८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.

Total Visitor Counter

3200201
Share This Article