दिवाळीत २०५० तर दसऱ्यात १३२९ वाहनांची नोंदणी
रत्नागिरी: रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर मिळून तब्बल १२ कोटींहून अधिक शासकीय महसूल प्राप्त केला आहे. जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे रत्नागिरीकरांनी सणांच्या काळात मोठ्या प्रमाणात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी गाड्या खरेदी केल्या.
दसरा मुहूर्तावर १३२९ वाहनांची तर दिवाळीच्या मुहूर्तावर २०५० वाहनांची नोंदणी झाली आहे, असे एकूण ३ हजार ३७९ वाहनांची नोंदणी झाली आहे. केवळ दिवाळीच्या मुहूर्तावर नोंदणी झालेल्या २ हजार ५० वाहनांतून आरटीओला ७ कोटी ३३ लाख ४९ हजार ९२८ इतके शासकीय उत्पन्न मिळाले. यात नोंदणी शुल्क आणि करातून ७ कोटी ४ लाख ४७ हजार ९२८ तर २७४ वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकातून २८ लाख ९३ हजार इतकी रक्कम शासन जमा झाली आहे.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजा करून रत्नागिरीकरांनी वाहन घरी नेले. दसऱ्यानंतर दिवाळीतही नागरिकांना वाहने वेळेत मिळावी म्हणून वाहनांची नोंदणीकरण्यासाठी रत्नागिरी आरटीओ विभागाने योग्य नियोजन केले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी ही माहिती दिली.






