राजापूर: राजापूर तालुक्यातील कोदवली गावात नव्याने सापडलेली सात एकाश्म मंदिरे ही शैव पाशुपत संप्रदायाची महत्त्वाची अधिष्ठान केंद्रे असावीत, असा निर्वाळा इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी दिला आहे. कोदवलीतील साहेबाचे धरण, शंकरेश्वर मंदिर, मांडवकरवाडी, देवाचे गोठणे सोगमवाडी आणि पांगरे येथे ही मंदिरे आढळून आली आहेत. यापूर्वीही पांगरे येथे अशीच एकाश्म मंदिरे व लेणी सापडली होती, ज्यामुळे राजापूर हे प्राचीन पाशुपत संप्रदायाचे केंद्र असल्याचे स्पष्ट होते.
कोदवली येथील साहेबाच्या धरणाजवळ एकूण चार एकाश्म मंदिरे आढळली आहेत, त्यापैकी दोन पूर्ण तर दोन अपूर्ण अवस्थेत आहेत. या मंदिरांना दरवाजा आणि गर्भगृह असे दोन भाग असून, गर्भगृहात चौकोनी आकाराचे अधिष्ठान आहे. या अधिष्ठानावर गोलाकार खड्डा असून, त्यावर ग्रेनाईट शिवलिंग बसवलेले असावे. यातील एक मंदिर आकाराने लहान असून ते अपूर्ण आहे.
दरम्यान, कोदवली शंकरेश्वराच्या मंदिराजवळ सापडलेले एकाश्म मंदिर पूर्णपणे जांभ्या दगडात कोरलेले आहे, मात्र ग्रामस्थांनी त्यावर प्लास्टर केले आहे. या मंदिरास आयताकृती प्रवेशद्वार असून आतमध्ये चौकोनी गर्भगृह आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला अधिष्ठान असून, त्यावर चौकोनी आकाराचे शिवलिंग कोरलेले आहे. शिवलिंगातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी मंदिरात एक जलमार्ग तयार केलेला आहे. मंदिराचा कळस त्रिकोणी पिरॅमिडप्रमाणे निमुळता होत गेलेला दिसतो.
कोदवली येथील मांडवकरवाडीत ब्राह्मणदेव
वहाळाजवळ दोन एकाश्म मंदिरे आढळून आली आहेत. ही दोन्ही मंदिरे आकाराने मोठी असून, त्यांचे दोन्ही दरवाजे चौकोनी आहेत. देवाचे गोठणे सोगमवाडी येथेही ‘नागधोबा’ नावाने प्रसिद्ध असणारे एकाश्म मंदिर आढळले असून, हे मंदिर मध्यम स्वरूपाचे आहे. याचा दरवाजाही चौकोनी असून, गर्भगृहात चौथरा आहे आणि त्यावरच अधिष्ठान देवता कोरलेली आहे. स्थानिक लोक त्याला नागधोबा नावाने ओळखतात. काही वर्षांपूर्वी अशीच काही एकाश्म मंदिरे तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथेही आढळून आली होती.
एकाश्म मंदिर म्हणजे एकाच मोठ्या शिलाखंडातून मंदिराची संपूर्ण वास्तू आंतरबाह्य स्वरूपात साकार करणे. ही एक प्रकारची मूर्तीशिल्प कला असून, एका अखंड शिळेतून नको असलेला भाग खोदून हे स्थापत्य तयार केले जाते. यात शाला, आच्छादन, गर्भगृह, स्तंभ, सभामंडप, शिखर आणि अधिष्ठान हे सर्व घटक एकाच पाषाणात निर्माण केलेले असतात. मात्र, लयन स्थापत्य आणि एकाश्म मंदिरात फरक असतो.
या मंदिरांच्या अभ्यासाअंती इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, राजापूर हे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. अर्जुना नदीच्या खाडीमार्गे व्यापारी माल राजापूरपर्यंत येऊन तो घाटमाथा मार्गे कोल्हापूर परिसरात जात असे. याच मार्गावर ही एकाश्म मंदिरे स्थापन केलेली दिसतात. सर्व मंदिरांची रचना पाहता हे एक धार्मिक उपासनेचे केंद्र असावे.
या मंदिरांमधील अधिष्ठान रचना पाहता, ही शैव पाशुपत संप्रदायातील महत्त्वाची केंद्रे असावीत. राजापूरची गंगा, धोपेश्वराचे प्राचीन मंदिर आणि पांगरे बुद्रुक येथे सापडलेली पाचव्या ते सहाव्या शतकातील लेणी यावरून राजापूर हे एक प्राचीन शैव केंद्र असल्याचे दुधाणे यांनी नमूद केले. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात शैव आणि वैष्णव पंथाचा प्रभाव वाढलेला दिसतो आणि पुढे सहाव्या शतकात या चळवळीने जास्त जोर धरला, असे त्यांचे मत आहे.
या शोधकार्यात पत्रकार विनोद पवार, शिवाजी कुंभार, संदीप राऊत, प्रा. अजय धनावडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मदत मिळाल्याचे दुधाणे यांनी सांगितले.
“कोकण जसे निसर्गाने समृद्ध आहे, तसेच विविध चमत्कारांनी सुद्धा भरलेले आहे. अश्मयुगापासून इसवी सनाच्या पूर्वकाळापर्यंत मानवी संस्कृतीचा घटक म्हणून सापडलेली कातळशिल्पे आणि पुरातत्त्व वारशाची खाण म्हणजे कोकण भूमी असून, आता सापडलेली एकाश्म मंदिरे हा राजापूरच्या प्राचीन अर्वाचीन काळाचा ठेवाच आहे.”
– अनिल दुधाणे, इतिहास संशोधक, पुणे