GRAMIN SEARCH BANNER

जमीर खलफे यांची संपर्क युनिक फाउंडेशनच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात गेली सात वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या ‘संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी’च्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते जमीर खलफे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही महत्त्वपूर्ण निवड झाल्याने सामाजिक वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे.

जमीर खलफे हे गेल्या सात वर्षांपासून संपर्क युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी अविरतपणे काम करत आहेत. गरजू आणि वंचितांना मदत करण्यापासून ते सामाजिक जनजागृतीपर्यंत अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या निष्ठावंत कार्याची दखल घेत संस्थेच्या सर्व सभासदांनी एकमताने त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. ही निवड म्हणजे त्यांच्या आजवरच्या कार्याची पावती असल्याचे बोलले जात आहे.

आपल्यावर सोपवलेल्या या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना जमीर खलफे यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, “आपणावर सोपवलेली जबाबदारी मी निश्चितच सर्वांच्या सहकार्याने पार पाडेन. आजपर्यंत जे काम मी करत आलो आहे, ते यापुढेही निरंतर सुरू ठेवणार आहे.” सभासदांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या निवडीप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, सल्लागार सुहेल मुकादम, सचिव युसूफ शिरगावकर, खजिनदार सय्यद मुल्ला यांच्यासह उपस्थित सर्व सभासदांनी जमीर खलफे यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खलफे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक कार्याचा एक नवा आदर्श प्रस्थापित करेल, अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -
Ad image

Total Visitor

0214040
Share This Article
Leave a Comment