मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी काल (29 ऑगस्ट) दिलेली परवानगी संपली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चा आणि गृहखात्याच्या अहवालानंतर, या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. सुरुवातीला यासाठी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती, मात्र आता मुंबई पोलिसांनी एक दिवसाची मुदतवाढ मंजूर केली आहे.
आज दिवसभर मुंबईतील आंदोलकांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विविध ठिकाणी वाहतूक आणि गर्दीची समस्या निर्माण केली. पोलिसांनी या पार्श्वभूमीवर काही कडक नियम आणि अटी लागू करण्याचा इशारा दिला होता. यामध्ये, आंदोलनस्थळी वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, आणि पावसाच्या शक्यतेनुसार सुरक्षित ठिकाणी आंदोलकांची व्यवस्था यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
आझाद मैदानातील जागा मर्यादित असल्याने, आज दिवसभर आंदोलकांनी तिथेच राहण्याची व्यवस्था केली होती. तथापि, आज संध्याकाळी आंदोलकांची मोठी संख्या वाशीच्या दिशेने निघाली आहे. मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवरील वाहतूक आता मोकळी झाली असून, गाड्या आणि टेम्पो वाशीच्या दिशेने जात आहेत. काही आंदोलक आजच्या रात्रीच्या राहण्याची सोय तिथेच करणार आहेत.
तर मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे हे मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली. त्यांनी वाहतूक, गर्दी व्यवस्थापन, आणि सुरक्षिततेसंबंधीचे मुद्दे चर्चेसाठी उपस्थित केले.
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. आज दिवसभर झालेल्या घटनाक्रमानंतर, उद्याच्या (दि. 30 ऑगस्ट) घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
आझाद मैदानात जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ





