पूनम देसाई यांचा त्याग पक्षासाठी प्रेरणादायी – शिवसैनिकांकडून गौरव
संगमेश्वर /एजाज पटेल : कसबा जिल्हा परिषद गटांतर्गत परचुरी गणासाठी शिवसेनेच्या वतीने सुरुवातीला पूनम देसाई यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पूनम देसाई या शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्या असून त्यांनी पक्षसंघटन, सामाजिक उपक्रम तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या नावाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच, ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छेने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.पक्षहित व संघटनेच्या एकतेसाठी पूनम देसाई यांनी घेतलेला हा निर्णय शिवसेनेतील कार्यकर्त्यांकडून त्यागपूर्ण व कौतुकास्पद मानला जात असून त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
पूनम देसाई यांच्या माघारीनंतर उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. परशुराम वेल्ये यांची सून, परचुरी गावच्या विद्यमान सरपंच तसेच शिवसेना पक्षाच्या उपविभाग प्रमुख शर्वरी वेल्ये यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.शर्वरी वेल्ये या गेल्या साडेतीन वर्षांपासून शिवसेनेच्या महिला उपविभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून महिला सक्षमीकरण, ग्रामविकास व सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे परचुरीसह संपूर्ण खाडी भागात त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे.
दरम्यान, त्यांचे सासरे श्री. परशुराम वेल्ये हे परचुरी गावच्या कुणबी संघटनेचे अध्यक्ष असून खाडी भागात कुणबी समाजासह सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचा भक्कम जनसंपर्क आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि विश्वासार्ह नेतृत्वाचा लाभ या निवडणुकीत निश्चितच होणार असल्याचे बोलले जात आहे.खाडी भागातील नागरिकांमध्ये शर्वरी वेल्ये या प्रचंड मतांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे. उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब यांनी खाडी भागात राबवलेली विकासकामे, विविध समाजघटकांसाठी केलेले कार्य तसेच विशेषतः कुणबी समाजासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
यावेळी श्री. परशुराम वेल्ये यांनी सांगितले की,
“हा विजय माझा वैयक्तिक नसून परचुरी गावाचा, संपूर्ण खाडी भागाचा तसेच माझ्या सर्व कुणबी बांधवांचा विजय असेल. मात्र सर्व बाबी अनुकूल असल्या तरी मायबाप मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून हा विजय अधिकाधिक भव्य करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
कसबा जि.प. गटासाठी शिवसेनेकडून शर्वरी वेल्ये यांना उमेदवारी






