GRAMIN SEARCH BANNER

मजगाव येथील शेतकरी मकबूल मुकादम यांच्या गायीने दिला प्रजासत्ताक दिनी २१ व्या वासराला जन्म

Gramin Varta
528 Views

कुटुंबाने केला अनोखा उत्सव साजरा

रत्नागिरी: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र असतानाच रत्नागिरीत एका आगळ्यावेगळ्या घटनेने आनंदाचे वातावरण अधिकच द्विगुणित झाले आहे. मजगाव येथील पशुपालक मकबूल मुकादम यांच्या गोठ्यातील एका गायीने आज २६ जानेवारी रोजी आपल्या २१ व्या वासराला जन्म दिला. एका गायीची ही २१ वी प्रसूती अत्यंत दुर्मिळ मानली जात असून, मुकादम कुटुंबीयांनी हा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला.

विशेष म्हणजे या गायीची प्रसूती कोणत्याही पशुवैद्यकीय मदतीशिवाय मकबूल मुकादम यांच्या शमीम मुकादम यांनी स्वतः दुपारी ठीक ३ वाजता केली. ही घटना केवळ मुकादम कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण परिसरातील पशुपालकांसाठी आश्चर्याचा आणि कुतूहलाचा विषय ठरली आहे. सामान्यतः गायींच्या आयुष्यात इतक्या मोठ्या संख्येने प्रसूती होणे ही बाब निसर्ग नियमानुसार अतिशय दुर्मिळ मानली जाते. मुकादम यांनी आपल्या गायीचा सांभाळ मुलाप्रमाणे केल्यामुळेच ती आजही इतकी सुदृढ असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जन्माला आलेल्या या वासरामुळे आणि गायीच्या या ‘विक्रमी’ प्रसूतीमुळे मुकादम यांच्या घरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या आनंदोत्सवा निमित्त परिसरात साखरेचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेक नागरिकांनी या गोड पाहुण्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Total Visitor Counter

3369669
Share This Article