GRAMIN SEARCH BANNER

निवखोल येथील दुचाकी अपघातातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
489 Views

रत्नागिरी : शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली होती. दीर्घकाळ उपचार सुरू असतानाच अखेर शुक्रवारी मध्यरात्री त्याने अखेरचा श्वास घेतला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नदीप रणजित खेतले (24, रा. निवखोल, रत्नागिरी) हा 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी (एमएच 08 बीएच 2850) वरून जात होता. त्याच्यासोबत मित्र रुद्र थुळ (18) हा मागे बसला होता. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील रस्त्याने विश्वनगरकडे जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट वीजेच्या खांबाला धडकले.

या अपघातात रत्नदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर रुद्र थुळ याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रत्नदीपची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. उपचारानंतर त्याला घरी आणण्यात आले होते. मात्र 25 डिसेंबर रोजी त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी त्याला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असतानाच शुक्रवारी मध्यरात्री रत्नदीपचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3072836
Share This Article