दिल्ली: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीला देशभरातून 32 राज्यांचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष आणि पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.
येत्या 5 वर्षात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देशभरातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणुका आयोगाची मान्यता मिळविणारा राष्ट्रीय पक्ष करायचा आहे. त्यासाठी किमान 4 राज्यांत मान्यता आणि 2 खासदार लोकसभेत निवडून आणले पाहिजेत. सध्या रिपब्लिकन पक्षाला मणिपूर आणि नागालँड या दोन राज्यांत मान्यता मिळालेली आहे. लवकरच रिपब्लिकन पक्षाला आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पाँडिचेरी, दीव दमण दादरा नगर हवेली या राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशात मान्यता मिळू शकते. आगामी काळात रिपब्लिकन पक्षाचे लोकसभेत खासदार निवडून येतील त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करून रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण केले पाहिजे, असे आवाहन रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.
रिपब्लिकन पक्ष दलित आदिवासी मुस्लिम सर्व अल्पसंख्यांक यांना घेऊन बहुजन वर्गाची एकजूट उभारून रिपब्लिकन पक्षाची राजकीय ताकद उभी करणार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तनाचा विचार देशभरात पोहोचवणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष देशभरात घराघरापर्यंत पोहोचवणार असल्याचा निर्धार आठवले यांनी व्यक्त केला.
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रामदास आठवले यांची बिनविरोध निवड
