राजन लाड/ जैतापूर: नुकत्याच नाटे बाजारपेठेत लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अपूर्वा सामंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन बाधित व्यावसायिक आणि नागरिकांना धीर दिला. त्यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी अपूर्वा सामंत यांनी आगीत सर्वस्व गमावलेल्या व्यापाऱ्यांशी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या दुःखात सहभागी होत, त्यांना दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
या आगीत ब्युटी पार्लर पूर्णतः खाक झालेल्या निकिता गोसावी या तरुणीला अपूर्वा सामंत यांनी “सर्वतोपरी मदत केली जाईल” असे ठाम आश्वासन दिले. निकिताच्या व्यवसायाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, ज्यात खुर्च्या, मशिन्स, कॉस्मेटिक साहित्य, मिरर सेट्स, ड्रायर, फेशियल यंत्रणा यांचा समावेश आहे, ते लवकरच पुरवले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. निकिताच्या उध्वस्त झालेल्या व्यवसायाला पुन्हा उभे करण्यासाठी वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर पाठबळ उभे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याचबरोबर, आगीमध्ये आर्थिक नुकसान झालेल्या टेलरिंग व्यवसायिकांना स्थानिक व्यापारी मंडळाच्या वतीने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी संघटनांनी एकत्र येत तातडीने मदतीची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. फोटोग्राफी व्यवसाय करणारे प्रसाद पाखरे यांचेही साहित्य आगीत जळून खाक झाले असून, त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी व्यापारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ‘फंड रेसिंग’ मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात येणार असून त्यांनाही मदत केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
या भेटीदरम्यान अपूर्वा सामंत यांनी इतरही नुकसानग्रस्त दुकानदारांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी केवळ आर्थिक मदतीवर लक्ष केंद्रित न करता, व्यवसाय पुनरुज्जीवन, कर्ज सवलत, आणि शासकीय योजनांचा लाभ यांसारख्या बहुआयामी मदतीचा विचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रशासन आणि सामाजिक संस्थांमध्ये समन्वय साधून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
या संकटकाळात नाटे परिसरात एकता, सामाजिक जाणीव आणि सहकार्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. “संकटात साथ” या मूल्यांची प्रचिती या कृतीतून ठळकपणे समोर आली आहे.