रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून 150 दिवस कृती आराखडयाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाही बाबत सादरीकरण मागविण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत गुणांकनाच्या अनुषंगाने सर्व मुद्यांबाबत कार्यवाही करण्यात आली. तयार केलेले सादरीकरण विभागीय आयुक्त कोंकण विभाग यांचे मार्फत शासनास सादर करणेत आले. यामध्ये कोंकण विभाग स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीची निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इतर पाच महसूल विभागातून प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड करण्यात आली असून एकूण 6 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण /SRV- 2025/प्र.क्र.27/का. 12 (सेवा) दि.09 जून 2025 अन्वये, अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरिता व पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्दिष्टाने ०६ मे, २०२५ ते ०२ ऑक्टोवर, २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम प्रत्येक प्रशासकीय विभागांनी राबविणेबाबत निर्देश आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्र.संकीर्ण- 1725/प्र.क्र.126/मातं दि.30 मे 2025 अन्वये सर्व विभाग व क्षेत्रिय कार्यालयांनी ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वकष सुधारणा करून, नागरिकांना अधिक सुलभरितीने सेवा पुरविणेसाठी 150 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, ई-प्रशासन सुधारणांवावत राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.