संगमेश्वर: शिवसेना संगमेश्वर तालुका आयोजित श्रावण महोत्सवातील पारंपारिक कोकणी महिला लोकनृत्य स्पर्धेत संगमेश्वर नावडी येथील ‘अमृता ग्रुप’ने तृतीय क्रमांक पटकावला आहे. देवरूख येथील मराठा भवन हॉलमध्ये रविवार, २७ जुलै रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत संपूर्ण तालुक्यातून २२ महिला गटांनी सहभाग घेतला होता. मंगळागौर, टिपरी नृत्य, शेतकरी नृत्य, जाखडी, नमन, आदिवासी नृत्य, समई नृत्य, परात नृत्य, वारी नृत्य अशा विविध प्रकारच्या लोकनृत्यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
संगमेश्वर नावडीच्या ‘अमृता ग्रुप’ने या स्पर्धेत विशेषतः २१ प्रकारच्या वेगवेगळ्या फुगड्या आणि ३३ विविध मंगळागौरीचे प्रकार असे एकूण ५४ प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या चमूत अमृता कोकाटे, सुविधा शेट्ये, सविता हळदकर, जानवी चिंचकर, आर्या मयेकर, नम्रता शेट्ये, सानिका कदम, सुप्रिया कदम, नयना शेट्ये, अर्पिता शेरे आणि संगीता जंगम या महिलांनी आपल्या कला सादर केल्या.
या सादरीकरणासाठी मंगळागौर गायनाची धुरा कु. आर्या राहुल कोकाटे हिने सांभाळली, तर तबला वादक गिरीराज लिंगायत, पेटीवादक यश जट्यार व शिवम भोसले आणि घुंगरू वादक ईश्वरी माईन यांनी उत्कृष्ट साथ दिली.
संपूर्ण तालुक्यातून आलेल्या २२ गटांमधून अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ‘अमृता ग्रुप’च्या महिलांचे संगमेश्वर परिसरातून कौतुक होत आहे. संसार, मुलांचे शिक्षण आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळून संध्याकाळचे दोन तास वेळ काढून या महिलांनी केलेल्या सरावाला आणि त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाला सर्व स्तरांतून विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या या यशाने कोकणी लोककला आणि संस्कृतीचे जतन करण्यास मदत होत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.