माजी खेड तालुका मनसे अध्यक्ष संदीप फडकले यांनी केला सत्कार
खेड : जिद्द, कठोर मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य काहीच नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचा सुपुत्र सुबोध संदीप मायनाक याने यशाची उंच भरारी घेतली आहे. सोलापूरच्या अकलूज येथे झालेल्या ७ व्या अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत, त्याची आगामी ऑल इंडिया टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप २०२५-२०२६ साठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे ही स्पर्धा होणार असून, या निवडीमुळे केवळ असगणी गावच नव्हे, तर संपूर्ण खेड तालुक्याचे नाव त्याने उज्वल केले आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत सुबोधने हे यश मिळवले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्याने आपल्या खेळाच्या स्वप्नांना कधीही मरू दिले नाही. मैदानावर तासन्तास घाम गाळून त्याने आपल्या कौशल्याला धार दिली आणि त्याचेच फळ त्याला आज मिळाले आहे. सोलापूर येथील स्पर्धेतील त्याची कामगिरी निवड समितीच्या नजरेत भरली आणि त्याची थेट महाराष्ट्र संघात निवड झाली.
सुबोधच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. खेड तालुका मनसे आणि असगणी गावातील ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे. माजी खेड तालुका मनसे अध्यक्ष संदीप हरी फडकले यांनीही सुबोधच्या यशाचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सुबोध मायनाकच्या या निवडीमुळे ग्रामीण भागातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत मेहनत आणि चिकाटी सोडली नाही, तर यश नक्कीच मिळते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे. आता मथुरा येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघासाठी दमदार कामगिरी करत, सुबोध मायनाक पुन्हा एकदा आपल्या भागाचा मान वाढवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.