मुंबई : महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यात नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५-२६ पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात १४ जुलैला शासन निर्णय जारी करत हा अभ्यासक्रम ५- ३- ३- ४ या नव्या आकृतीबंधावर आधारित असून, तो टप्प्याटप्प्याने सर्व शाळांमध्ये लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नव्या धोरणानुसार, पारंपरिक १०-२ प्रणालीऐवजी बालवाडी ते पदवीपर्यंत शिक्षणाची अखंड साखळी तयार केली आहे. बालवयातील शिक्षण, मूल्यमापन, पाठ्यपुस्तक निर्मिती आणि शिक्षक प्रशिक्षण या सर्व पातळ्यांवर अभ्यासक्रमात बदल होणार आहे. इयत्ता पहिलीसाठी २०२५-२६, इयत्ता दुसरी ते सहावी २०२६-२७मध्ये, तर बारावीपर्यंत २०२८-२९ पर्यंत हा अभ्यासक्रम पूर्णपणे लागू होईल.
नवीन अभ्यासक्रमात अनुभवाधारित, आनंददायक, समावेशी आणि मूल्याधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. संख्याज्ञान, भाषा, तार्किक विचार, जीवनकौशल्ये, सर्जनशीलता आणि स्थानिक गरजांनुसार विषयवस्तू समाविष्ट केली जाणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व बालभारतीमार्फत पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार केंद्रस्तरीय अभ्यासक्रमाचा राज्याभिमुख वापर होणार आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण, समग्र मूल्यांकन पत्रक, सेतू अभ्यासक्रम तसेच शालेय वेळापत्रक व सत्र प्रणालीत बदल केले जातील.
नवा आकृतीबंध असा…
पायाभूत स्तर वय वर्षे ३ ते ८ बालवाडी १, २, ३ व इयत्ता पहिली व दुसरी
पूर्वतयारी स्तर वय वर्षे ८ ते ११ तिसरी, चौथी, पाचवी
पूर्व माध्यमिक स्तर वय वर्षे ११ ते १४ सहावी ते आठवी
माध्यमिक स्तर वय वर्षे १४ ते १८ नववी ते बारावी
नवीन अभ्यासक्रम
अंमलबजावणी (वर्षनिहाय)
२०२८-२९
आठवी, दहावी, बारावी
२०२७-२८
पाचवी, सातवी, नववी, अकरावी
२०२६-२७
दुसरी, तिसरी,
चौथी, सहावी
२०२५-२६
इयत्ता पहिली
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
