GRAMIN SEARCH BANNER

कोकरे महाराजांच्या गुरुकुलात पुन्हा खळबळ! विद्यार्थ्यांच्या रॅगिंग आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाने उडाली खळबळ

Gramin Varta
6 Views

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुलात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अलीकडेच या गुरुकुलाचे प्रमुख ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांना विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी अटक झाली होती. ते प्रकरण ताजे असतानाच आता या शाळेतील वर्ग मॉनिटरने इतर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो व व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप समोर आला आहे.

या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मॉनिटरविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, त्या मॉनिटरने वर्गातील इतर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो मोबाईलमध्ये टिपले आणि “कुणालाही सांगायचं नाही” अशी धमकी देत त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर काही विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ किंवा व्यसनाधीन बनवण्याचाही त्याने प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना सप्टेंबर 2025 मध्ये घडली आहे. या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0315/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 74, 79, 131, 352, 351(2) प्रमाणे गुन्हा नोंदवला गेला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्यावर यापूर्वीच विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी POCSO कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून, न्यायालयाने त्यांना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एका मागोमाग दोन गंभीर घटना उघडकीस आल्याने “जीवनमुक्त गुरुकुल”च्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात आणि राज्यात या प्रकरणामुळे तीव्र चर्चा रंगली असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

2686768
Share This Article