GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने दिले जीवदान; १५ मिनिटांत सुरक्षित सुटका!

Gramin Varta
345 Views

मजगाव येथे सकाळी घडली घटना; बिबट्या सुस्थितीत, नैसर्गिक अधिवासात मुक्त

रत्नागिरी/ सिकंदर फरास: बिबट्या विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी, दिनांक २३/१०/२०२५ रोजी सकाळी रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे घडली. मौजे मजगाव येथील श्री. अबीद अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीच्या आंबा कलम बागेतील कठडा असलेल्या विहिरीमध्ये एक बिबट्या पडला होता. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन केवळ १५ मिनिटांत बिबट्याची यशस्वीरित्या सुटका केली आणि त्याला सुरक्षित जीवदान दिले.

सकाळी अंदाजे ९.३० वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी वनपाल पाली यांना फोनवरून बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांना सदरची माहिती देण्यात आली व रेस्क्यू टीम, पिंजरा आणि आवश्यक साहित्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, आंबा कलम बागेतील ती विहीर कच्ची आणि आयताकृती होती. तिची लांबी सुमारे १५ फूट, रुंदी १० फूट आणि खोली २५ फूट होती. विहिरीत पाण्याची पातळी ७ ते ८ फुटांवर होती आणि बिबट्या पाण्यात असलेल्या एका दगडावर बसलेला होता. बिबट्याला पाहिल्यानंतर तात्काळ जाळीचे नेट विहिरीच्या सभोवती टाकून विहीर बंदिस्त करण्यात आली. त्यानंतर पिंजऱ्याला दोऱ्या बांधून तो सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला. वन विभागाच्या प्रशिक्षित टीमच्या प्रयत्नांमुळे अवघ्या पंधरा मिनिटांतच बिबट्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षितपणे पकडला गेला.

बिबट्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. तपासणीमध्ये बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे ६ ते ७ वर्षे आहे. स्थानिक परिस्थितीनुसार, विहिरीवर शेडनेट टाकलेले असून बिबट्या भक्षाचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी-चिपळूण, श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण रेस्क्यू कार्यवाही यशस्वी झाली.

या कामगिरीसाठी श्री. प्रकाश सुतार (परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी), श्री. न्हानू गावडे (वनपाल, पाली), श्री. सारीक फकीर (वनपाल, लांजा), श्री. विराज संसारे (वनरक्षक, रत्नागिरी), श्रीमती शर्वरी कदम (वनरक्षक, जाकादेवी) यांनी विशेष मेहनत घेतली. या बचावकार्यासाठी प्राणी मित्र श्री. शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, शोएब नाकाडे तसेच पोलीस अधिकारी श्री. भगवान पाटील, श्री. राजेंद्र सावंत, श्री. शरद कांबळे, श्री. रामदास कांबळे, दिवे, गावचे सरपंच श्री. फैय्याज मुकादम,गावचे तंटामुक्ती अध्यक्ष बरकत मुकादम, पोलीस पाटील अशोक केळकर, मुज्जू मुकादम, बाबू इबजी आणि गावातील इतर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशस्वी कामगिरीनंतर वनाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी विभागीय वनाधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरिजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Total Visitor Counter

2686714
Share This Article