GRAMIN SEARCH BANNER

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : आजअखेर 37 शिबीरांचा 1 हजार 696 जणांना लाभ

Gramin Varta
62 Views

128 मोतीबिंदू शस्त्रक्रिया; 843 जणांची चष्म्यासाठी नोंदणी

रत्नागिरी:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) चालणाऱ्या या भव्य उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 1 हजार 437 मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज अखेर 37 शिबीरांमधून 1 हजार 696 जणांनी या शिबीराचा लाभ घेतला असून, 128 रुग्णांची शस्त्रक्रिया पार पडली आहे. 843 जणांना चष्मा देण्यात येणार आहे अशी माहिती मोहीम प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.

मुख्यमंत्री यांची संकल्पना

संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या भव्य उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यातील तालुका व गावपातळीवर एकूण 137 शिबीरांचे नियोजन मोहीम कालावधीत करण्यात आले आहे. आजअखेर 37 शिबीरे घेण्यात आली आहेत.  गावपातळीवरील, वाड्या वस्त्यांवरील, दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा लाभ मिळत आहे. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग

या अभियानात सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्र, अशासकीय स्वयंसेवी संस्था, नेत्र रुग्णालय, नॅब नेत्र रुग्णालय, लायन्स नेत्र रुग्णालय, डेरवण मेडिकल कॉलेज,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय रुग्णालये, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच खासगी नेत्रतज्ज्ञ रुग्णालये व विविध सामाजिक संस्था सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी ठरत आहे.

तळागाळातील नागरिकांसाठी दिलासा

नेत्ररोग उपचाराचा खर्च गोर-गरीब नागरिकांना परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत आहे.

आज अखेर अभियानातून मिळालेला लाभ
• अभियानात सहभागी रुग्णालयांची संख्या : 83
• आयोजित शिबिरांची संख्या : 37
• शिबिरांत सहभागी एकूण रुग्णसंख्या : 1696
• पुढील उपचारासाठी संदर्भित रुग्ण : 278
• मोफत चष्म्यासाठी नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या : 843
• मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडलेल्या रुग्णांची संख्या : 128
जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी : 41
नॅब नेत्र रुग्णालय चिपळूण: 62
डेरवण मेडिकल कॉलेज: 12
लायन्स नेत्र रुग्णालय रत्नागिरी: 13

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक (मंत्रालय, मुंबई) -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यापुढे ठेवून सुरू केलेले ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ प्रेरणादायी व महत्त्वपूर्ण आहे. या अभियानातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत नेत्रचिकीत्सा करण्यात येत आहे. विशेषतः झोपडपट्टी व भटक्या समाजातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. जे रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ शकत नव्हते, त्यांनाही मोफत उपचाराची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम तळागाळातील जनतेसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

रत्नागिरी जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप हे या मोहिमेचे प्रमुख असून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि उपायुक्त धर्मादाय संस्था हे सदस्य आहेत. जिल्हा रुग्णालयातील नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सुनील डोखळे यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यासाठी जिल्हा नोडल नेत्र शल्यचिकित्सक डॉ. वनिता कानगुले संपूर्ण जिल्ह्यातील नियोजन करत आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश सिरसाट हे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथील तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र चे नियोजन करत आहेत.

Total Visitor Counter

2650628
Share This Article