गुहागर: तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी आणि वृद्धांवर झालेल्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हेदवी येथील मोरेवाडी येथे राहणाऱ्या एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेला तिच्या सख्ख्या चुलत दिराने कोणतेही कारण नसताना लाकडी रिपेने कपाळावर मारून जखमी केले. एवढेच नव्हे, तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिच्या ७६ वर्षीय पतीलाही आरोपीने मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही वृद्ध पती-पत्नी जखमी झाले आहेत.
गुहागर तालुक्यातील हेदवी, हेदवतड, मोरेवाडी येथे दि. २०/०९/२०२५ रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी सुनिता रामचंद्र मोरे (वय ७१, व्यवसाय गृहिणी) या त्यांच्या घराच्या अंगणात कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी त्यांचे शेजारी राहणारे सख्खे चुलत दीर एकनाथ गोविंद मोरे (वय ५५) हे तेथे आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही ठोस कारणाशिवाय एकनाथ मोरे यांनी शिवीगाळ करत सुनिता मोरे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात असलेल्या लाकडी रिपेने त्यांनी थेट सुनिता मोरे यांच्या कपाळावर मारून त्यांना जखमी केले. मारहाण करताना ‘तुम्हाला ठार मारून टाकेन’ अशी जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली.
यावेळी पत्नीला मारहाण होत असल्याचे पाहून सुनिता मोरे यांचे पती रामचंद्र महादेव मोरे (वय ७६) हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, आरोपी एकनाथ मोरे यांनी त्यांनाही सोडले नाही. त्यांनी रामचंद्र मोरे यांनाही त्याच लाकडी रिपेने त्यांच्या डाव्या हातावर मारहाण केली, ज्यामुळे ते देखील जखमी झाले.
या घटनेनंतर वृद्ध मोरे दाम्पत्याने गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या गंभीर प्रकाराची तक्रार दिल्यानंतर दि. २३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर : क्षुल्लक कारणावरून चुलत दिराकडून वृद्ध वहिनीला व भावाला रिपेने मारहाण
