रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी, १७ जून रोजी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास घडली आहे. मुलाने घरात कोणालाही काहीही न सांगता घर सोडले असून, त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय अल्पवयीन मुलाच्या मामाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमजद अलीमियाँ सोलकर (रा. राजीवडा, रत्नागिरी, व्यवसाय – मासेमारी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचा अल्पवयीन भाचा घरात कोणालाही कल्पना न देता घरातून निघून गेला. फिर्यादीने त्याचा रत्नागिरी शहर परिसर, रेल्वे स्थानक, बसस्थानक, तसेच नातेवाईक आणि मित्रांकडे कसून शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आला नाही.
दरम्यान, फिर्यादीच्या बहिणीच्या ओळखीच्या नाझिया नावाच्या महिलेला (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) त्या अल्पवयीन मुलाने त्याच्या मोबाईलवरून फोन करून आपण बाणकोट येथे येत असल्याचे सांगितले होते. मात्र, तो नाझिया यांच्याकडेही अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे फिर्यादीच्या भाच्याशी अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
यावरून अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा संशय सोलकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरीतून राजीवडा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा
