GRAMIN SEARCH BANNER

1 लाख 35 हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता; राज्यात एक लाख नवे रोजगार निर्माण होणार

मुंबई : उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने सेमीकंडक्टर, सिलीकॉन यासारख्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या 1 लाख 35 हजार 371 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना बुधवारी (2 जुलै) मान्यता दिली आहे.

यामुळे राज्यात सुमारे 1 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्योग विभागातंर्गत विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना सामूहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत तसेच थ्रस्ट सेक्टरच्या धोरणातंर्गत प्रोत्साहने मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची 12 वी बैठक आज विधानभवनात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेशकुमार यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये एकूण 19 मोठे, विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना सदर प्रकल्पातील गुंतवणूक तसेच रोजगारनिर्मिती विचारात घेऊन त्यांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी 17 प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पांमध्ये सेमीकंडक्टर, सिलीकॉन, इग्नॉट आणि वेफर्स, सेल आणि मॉडयुल, इलेक्ट्रीक वाहनांची साहित्यनिर्मिती, लिथियम आयन बॅटरी, अवकाश आणि सरंक्षण साहित्य निर्मिती, वस्त्रोद्योग, हरित स्टील प्रकल्प, ग्रीन फिल्ड गॅस टू केमिकल आदी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या 17 प्रकल्पांमधून रूपये 1 लाख 35 हजार कोटींची नवीन गुंतवणूक राज्यात येत असून त्याद्वारे राज्यात आगामी कालावधीत अंदाजे एकूण 1 लाख एवढी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.

आज मंजुरी दिलेल्या प्रस्तावांमध्ये नवी मुंबईतील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी, नागपूरमधील ज्युपिटर रिन्यूएबल प्रा.लि., रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, मे. बीएसएल सोलार प्रा.लि, मे. श्रेम बायो फ्यूएल प्रा.लि., पुण्यातील ह्युंदाई मोटार इंडिया, युनो मिंडा अँटो इनोव्हेशन प्रा.लि, एअर लिक्विड इंडिया होल्डिंग प्रा. लिं., रायगडमधील एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि., बालासोर अलॉयज लि, गडचिरोलीतील सुरजागड इस्पात प्रा.लि., सुफलाम इंडस्ट्रीज लि, सुफलाम मेटल प्रा.लि. किर्तीसागर मेटालॉय प्रा.लि., नंदूरबारमधील मे. जनरल पॉलिफिल्मस प्रा.लि, छत्रपती संभाजी नगरमधील एनपीएसपीएल अडव्हान्सड मटेरियल्स प्रा.लि, गोंदियातील सुफलाम इंडस्ट्रिज लि., साताऱ्यातील मे. वर्धन अँग्रो प्रोसेसिंग लि, सोलापूरमधील मे. आवताडे स्पिनर्स प्रा. लि या कंपन्यांचा समावेश आहे.

Total Visitor Counter

2475126
Share This Article