GRAMIN SEARCH BANNER

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार – मल्लिकार्जुन खरगे

दिल्ली: “जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसला ना आनंद आहे ना दु:ख. जे व्हायचं होतं ते झालं. आता या पदासाठी निवडणूक होणार आहे. सरकारकडून त्यासाठी अधिसूचना जारी होईल.

काँग्रेस आपला उमेदवार देणार असून, आम्ही त्यासाठी तयारी करू.”असे मंगळवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सोमवारी उशिरा दिलेल्या राजीनाम्यानंतर या पदासाठी निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोग कधीही उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू करू शकतो. दरम्यान, काँग्रेसनेही या पदासाठी उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे.

राज्यसभेत सुरू असलेल्या गदारोळाबाबत खरगे म्हणाले की, “सरकार संसद चालवू इच्छित नाही. संसद सुरू होताच एका मिनिटात सभागृह स्थगित केलं जातं. विरोधक पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करू इच्छितात. पण सत्ताधारी कोणतीही माहिती देत नाहीत. चर्चेसाठी वेळ निश्चित करावा लागेल आणि पंतप्रधान सभागृहात कधी उपस्थित राहतील याबाबतही स्पष्टता हवी.”

धनखड यांनी आरोग्याला प्राधान्य देत दिला राजीनामा

उल्लेखनीय आहे की, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे सादर केला. आपल्या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे की, आता ते आपल्या आरोग्याला प्राधान्य देतील.धनखड यांनी आपल्या पत्रात संविधानाच्या अनुच्छेद 67 (ए) नुसार, तात्काळ प्रभावाने उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यांनी ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली होती, आणि त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता.

एनडीएचा संख्याबळात वरचष्मा

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. तसेच राज्यसभेतील नामनिर्दिष्ट सदस्यांनाही मतदानाचा हक्क असतो. सध्या लोकसभेत 543 जागांपैकी 542 सदस्य आहेत, तर राज्यसभेत 245 जागांपैकी 5 जागा रिक्त असून 240 सदस्य आहेत.संविधानानुसार, उपराष्ट्रपतीच्या राजीनाम्यामुळे, मृत्यूमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने पद रिक्त झाल्यास, लवकरात लवकर निवडणूक घेणं आवश्यक असतं. त्यामुळे कोणत्याही वेळी निवडणूक आयोग अधिसूचना जारी करू शकतो. संख्याबळाच्या दृष्टीने एनडीएकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे त्यांचाच वरचष्मा दिसतो.

मागील निवडणुकीत मार्गरेट अल्वांचा पराभव

यूपीए आघाडीने आणि काही इतर पक्षांनी 17 जुलै 2022 रोजी मार्गरेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. मात्र, जगदीप धनखड यांनी त्यांना 528 मतांनी पराभूत करत निवडणूक जिंकली होती.

Total Visitor Counter

2455621
Share This Article