लांजा (प्रतिनिधी): देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रति प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यंदाही १८०० राख्या पाठवल्या आहेत. गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेल्या या भावनिक परंपरेतून विद्यार्थिनींनी यंदा १५८ बी.एन.बी.एस.एफ. पंजाब येथील जवानांसाठी राख्या आणि शुभेच्छापत्रे पाठवून आपला स्नेह व्यक्त केला.
न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा यांच्यावतीने हा अभिनव उपक्रम गेली २७ वर्षे सातत्याने राबवला जात आहे. याच परंपरेनुसार यंदाही विद्यार्थिनींनी जवानांसाठी राख्या तयार केल्या. या राख्यांसोबत त्यांनी जवानांना पत्र लिहून राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. ‘जवान सीमेवर तैनात असल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत’ या भावनेने प्रेरित होऊन विद्यार्थिनी दरवर्षी प्रेमाचे आणि अभिमानाचे हे प्रतीक पाठवतात.
या उपक्रमावेळी उपमुख्याध्यापक वसंत आजगावकर, पर्यवेक्षक मंगेश वाघाटे, सहायक पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर, शिक्षिका किर्ती परवडी, प्रमिला पाटील, मधुरा सिनकर आणि अजय आग्रे यांची उपस्थिती होती. देशभक्ती, एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम भविष्यातही असाच अखंड सुरू राहील, असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. विद्यार्थिनींनी पाठवलेल्या या राख्यांमुळे जवानांनाही आपल्या बहिणी आठवतील, अशी भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.